Join Whatsapp

शेतकरी साठी नवीन स्पर्धा – रब्‍बी हंगाम पीकस्‍पर्धा २०२४ मध्ये सहभागी व्हा, आणि जिंका आकर्षक बक्षिश

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क: मुंबई, दि. ३ : राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन  अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना  होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश  ठेऊन राज्यांतर्गत  पीकस्पर्धा  योजना राबविण्यात येत आहे.

पिकस्‍पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका, जिल्‍हा व राज्‍य पातळीवर राबविण्‍यात येत आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस  या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

पीकस्पर्धेतील पीके : रब्बी पीके – ज्वारीगहूहरभराकरडई व जवस (एकूण ०५ पिके)

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या  स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान  ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा अर्जासोबत सादर करावा.

रब्‍बी  हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल – प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३००/- राहील व आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५०/- राहील.

तालुका पातळी :  पहिले बक्षिस पाच हजार रुपये, दुसरे बक्षिस तीन हजार रुपये, तिसरे बक्षिस दोन हजार रुपये.

जिल्हा पातळी  : पहिले बक्षिस दहा हजार रुपये, दुसरे बक्षिस सात हजार रुपये, तिसरे बक्षिस  पाच हजार रुपये

राज्य पातळी : पहिले बक्षिस ५० हजार रुपये, दुसरे बक्षिस ४० हजार रुपये, तिसरे बक्षिस  ३० हजार रुपये

नमुद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्‍हावी याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  पिकस्‍पर्धेत सहभागी व्‍हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्‍यात येत आहे. पिकस्‍पर्धेबाबत अधिक माहितीसाठी  शेतकरी बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच महाराष्ट्र  शासन कृषी  विभागाचे संकेतस्‍थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!