Join WhatsApp group

Ads

दुष्काळाच्या सावटात गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड; न्यू गणेश मंडळाचा आदर्श निर्णय

By Sarkarmzanews

September 24, 2026 5:27 pm

Ads

विसर्जन मिरवणूक न काढता ₹११ हजारांची मदत; इतर मंडळांनीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, हा संदेश

मूर्तिजापूर | प्रतिनिधी

मूर्तिजापूर तालुक्यावर दुष्काळाचे सावट असताना गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत न्यू गणेश मंडळ, स्टेशन विभाग, मूर्तिजापूर यांनी यंदा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुष्काळी परिस्थिती, पाण्याची टंचाई आणि शेतकऱ्यांची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन यंदा गणपती विसर्जनाची मिरवणूक न काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला. मिरवणुकीवर होणारा खर्च टाळून मंडळाच्या वतीने ₹११ हजारांची आर्थिक मदत मुख्यमंत्री किसान सहाय्यता निधीसाठी देण्यात आली.

ही आर्थिक मदत तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत असून. उत्सव साजरा करताना समाजातील संकटग्रस्त घटकांचाही विचार करता येतो, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

दुष्काळाची परिस्थिती पाहून मिरवणूक न काढण्याचा निर्णय

यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील शेती संकटात आहे. अनेक भागांमध्ये पिकांवर परिणाम झाला असून पाण्याची उपलब्धताही चिंतेचा विषय बनली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत असताना मोठ्या प्रमाणावर खर्च करून उत्सव साजरा करण्यापेक्षा त्यातील काही रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा विचार मंडळाने केला.

मंडळाचे अध्यक्ष अमित नागवान यांनी पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून यंदा गणपती विसर्जनाची मिरवणूक न काढण्याचा निर्णय कळविला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या हा निर्णय घेतला असून त्यानुसार ₹११ हजारांची मदत करण्यात आली.

ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी गणेश मंडळांनी दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत न्यू गणेश मंडळाने हा उपक्रम राबविला.मंडळाच्या निर्णयाचे पोलिस प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले.

ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी मंडळाचे अध्यक्ष अमित नागवान यांचे श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केला. तसेच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार महाडिक यांनीही या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या उपक्रमा वेळी मोहित नागवान, अमित नागवान, चेतन नागवान, अप्पू तिडके, सर्वेश लोहिकपुरे, गोलू लोकरे, सागर नागवान, राम जोशी आणि श्याम शर्मा यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी पीएसआय राजू शिंदे, पीएसआय नितीन राठोड, एपीआय चौधरी, गजानन थाटे तसेच पत्रकार मंडळी उपस्थित होती.

एका मंडळाच्या निर्णयातून इतर मंडळांनाही प्रेरणा मिळणार?

गणेशोत्सव हा श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. मात्र यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता उत्सव साजरा करताना परिस्थितीचे भान ठेवण्याची गरज आहे. न्यू गणेश मंडळाने मिरवणूक न काढता ₹११ हजारांची मदत करून उत्सवातील खर्चाला सामाजिक कार्याची दिशा दिली आहे.

हा निर्णय केवळ एका मंडळापुरता मर्यादित न राहता मूर्तिजापूर शहरातील इतर गणेश मंडळांमध्येही सामाजिक जागरूकता निर्माण करणारा ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.इतर मंडळांनीही आपल्या आर्थिक क्षमतेनुसार शेतकरी, गरजू कुटुंबे, पाणीटंचाईग्रस्त नागरिक किंवा इतर सामाजिक उपक्रमांसाठी मदत केली, तर अनेक छोट्या-छोट्या मदतींचे रूपांतर मोठ्या सामाजिक हातभारात होऊ शकते.

प्रश्न ₹११ हजारांचा नाही, तर सामाजिक संवेदनशीलतेचा

न्यू गणेश मंडळाने दिलेली ₹११ हजारांची मदत ही केवळ आर्थिक रक्कम म्हणून पाहण्यापेक्षा त्यामागील सामाजिक विचार महत्त्वाचा आहे. उत्सवातील आनंद कायम ठेवतानाच समाजातील अडचणीत असलेल्या घटकांच्या पाठीशी उभे राहता येते, हे मंडळाने कृतीतून दाखवून दिले आहे.

एका मंडळाने सुरुवात केली आहे; आता इतर मंडळेही आपल्या परीने पुढाकार घेणार का? दुष्काळाच्या काळात गणेशोत्सवातील काही खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वळवून शेतकऱ्यांना मदतीचा हात देता येईल का, हा विचार प्रत्येक मंडळाने करण्याची वेळ आली आहे.

‘उत्सवही राहू द्या आणि संवेदनाही जपू या!’ या भावनेतून यंदाचा गणेशोत्सव सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!