Join WhatsApp group

Ads

तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच आरक्षणाची सोडत पूर्ण मूर्तिजापूर तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

By Sarkarmzanews

September 10, 2026 6:00 pm

Ads

मूर्तिजापूर : सन २०२५-२०३० या कालावधीसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया गुरुवारी (१० सप्टेंबर) तहसील कार्यालयातील शासकीय धान्य गोदाम क्रमांक ६ येथे पार पडली. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी शिल्पा बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग (ना.मा.प्र.) तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण निश्चित करण्यात आले.

मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच निवडणूक) नियम, १९६४ मधील नियम ५ व ६ मधील तरतुदीनुसार ही प्रक्रिया राबविण्यात आली. आरक्षण सोडतीबाबत पूर्वप्रसिद्धी देण्यात आली होती. सोडतीच्या वेळी उपस्थित नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही नोंदवहीत घेण्यात आल्या.

तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी सुरुवातीला सरपंच पदांच्या आरक्षणाची नियमावली आणि शासनाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर आरक्षणाची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगाच्या २३ जुलै २०२६ रोजीच्या पत्रानुसार एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणात सुधारणा करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार १२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रातील ग्रामविकास विभागाच्या शुद्धिपत्रकानुसार नागरिकांचा मागासवर्ग आणि खुला अर्थात सर्वसाधारण प्रवर्गाच्या आरक्षणात सुधारणा करण्यात आली. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात आले.

अनुसूचित जाती प्रवर्ग

मूर्तिजापूर तालुक्यातील खालील ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

विरवाडा, शेलुबाजार, लोणसणा, रामटेक, रंभापूर, वाईमाना, समशेरपूर, शेरवाडी, पारद, नवसाळ, राजनापूर — अनुसूचित जाती.

तर खिनखिनी, घुंगशी, सांगवी दुर्गवाडा, खापरवाडा, लंघापूर, हिवरा कोरडे, कवठा सोपीनाथ, राजुरा सरोदे, मोडझर, सांजापूर (हिरपूर), धानोरा वैघ आणि निभा या ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्ग

भगोरा — अनुसूचित जमाती, तर बोर्टा आणि कानडी — अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत.

नागरिकांचा मागासवर्ग

ना.मा.प्र. प्रवर्गासाठी पोही, गाजीपूर, जामठी बु., जितापूर खेडकर, गोरेगाव, किनखेड, मुंगशी आणि दापूरा या ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले आहे.

तर मंगरूळ कांबे, लाखपुरी, कवठा खोलापूर, मंदुरा, कुरुम, सोनाळा, बिडगाव, खांदला आणि माटोडा (वडगाव) या ग्रामपंचायती ना.मा.प्र. महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

सर्वसाधारण प्रवर्ग

सर्वसाधारण प्रवर्गासाठी सांगवा मेळ, दताळा, दातवी, ब्रम्ही खुर्द, बपोरी, खाडद, वडगाव, धामोरी बु., बोरगाव निघोट, खरब नवले, उमरी, मुरबा, शिवण खुर्द, आरखेड, सालतवाडा, अनभोरा, मोहखेड, धानोरा पाटेकर, कार्ली, भटोरी, मधापुरी, नागोली आणि कव्हळा या ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले आहे.

तर जांभा खुर्द, रेपाडखेड, टिपटाळा, येंडली, सोनौरी (बपोरी), माना, दहातोंडा, हातगाव, हिरपूर, सिरसो, जांभा बु., चिखली, कंझरा, धोत्रा शिंदे, राजुरा घाटे, विराहित, सोनौरी (मूर्तिजापूर), कोळसरा, शेलूनजीक आणि अकोली जहाँगीर या ग्रामपंचायतींचे सरपंच पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

आरक्षण निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील सर्व ८६ ग्रामपंचायतींचे आरक्षण उपस्थितांसमोर वाचून दाखविण्यात आले. तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी उपस्थितांचे आभार मानून आरक्षण सोडत सभा समाप्त झाल्याचे जाहीर केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!