Join WhatsApp group

Ads

पत्रकार हिताला प्राधान्य देत संघटनात्मक बांधणी मजबूत करा : संदीप काळे

By Sarkarmzanews

September 7, 2026 10:56 pm

Ads

व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या अकोला जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रीकांत पाचकवडे;

अकोला जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन

अकोला : पत्रकार आणि पत्रकारितेच्या हितासाठी केवळ चर्चा न करता संघटनात्मक बांधणी, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि लोकशाही मार्गाने कृतिशील लढा उभारणे आवश्यक आहे. पत्रकारांच्या समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी प्रत्येक पत्रकाराने पत्रकारहिताला प्राधान्य द्यावे. पत्रकारितेतील विश्वासार्हता, प्रतिष्ठा आणि ताकद टिकविण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मीडिया – व्हीओएम इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ संपादक संदीप काळे यांनी केले.

अकोला येथील माहेश्वरी भवनात व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या संघटनात्मक बांधणीसाठी परिसंवाद व बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संदीप काळे यांच्या हस्ते फोरमच्या अकोला जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

याच कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत पाचकवडे यांची व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या अकोला जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी फोरमचे साप्ताहिक विंगचे राष्ट्रीय मार्गदर्शक विनोद बोरे, जिल्हाध्यक्ष शंकर जोगी, मार्गदर्शक अरुण मोडक, रुबेन वाळके, कार्याध्यक्ष श्रीकांत पाचकवडे, विधी सल्लागार ॲड. पप्पू बोरवाल, शहराध्यक्ष महेंद्र डोंगरे, उपाध्यक्ष संदीप देशमुख, सचिव प्रशांत भटकर, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष संजय वाड, पातूर तालुकाध्यक्ष सुभाष इरुलकर, पातूर कार्याध्यक्ष रामेश्वर जाधव, बाबा निंगरे, बी. एन. राठोड, मनोहर मानकर, निलेश इंगळे, विनोद पटेल, बबन इंगळे यांच्यासह पदाधिकारी, पत्रकार व सदस्य उपस्थित होते.

बदलत्या पत्रकारितेला संघटित प्रतिसादसंदीप काळे म्हणाले की, तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमे, सोशल मीडिया आणि बदलती माध्यमव्यवस्था यामुळे पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. या बदलांना सकारात्मक दिशा देतानाच पत्रकारांचे हक्क, प्रश्न आणि विविध मागण्यांसाठी शासन-प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे. पत्रकारांच्या प्रश्नांवर निवेदने, बैठका, पाठपुरावा तसेच गरजेनुसार लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून कृतिशील भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे संघटनात्मक जाळे सध्या ८७ देशांमध्ये विस्तारले असून डिजिटल, साप्ताहिक, पाक्षिक, वृत्तपत्र, रेडिओ आणि टीव्ही अशा विविध माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकारांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम सुरू असल्याचे काळे यांनी सांगितले.

“संघटना ही केवळ पद किंवा प्रतिष्ठेचे माध्यम नसून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी जबाबदारी स्वीकारण्याचे व्यासपीठ आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

अकोला जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीला वेगअकोला जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, प्रशिक्षण व मार्गदर्शन तसेच पत्रकारहिताचे विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, याच महिन्यात अकोला येथे व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचा पदग्रहण सोहळा आणि कॅडर कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सुमारे ५०० पदाधिकारी, पत्रकार व सदस्य सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शंकर जोगी यांनी दिली. बदलत्या पत्रकारितेची आव्हाने, आधुनिक तंत्रज्ञान, संघटनात्मक कार्यपद्धती आणि पत्रकारहिताच्या आगामी उपक्रमांवर या कॅडर कॅम्पमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शंकर जोगी म्हणाले…

“अकोला जिल्ह्यात पत्रकारांची एकजूट अधिक मजबूत करून पत्रकारांच्या न्याय्य प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याचा संकल्प आहे. नव्या कार्यालयाच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल. प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि पत्रकारहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील. आगामी कॅडर कॅम्पच्या माध्यमातून पदाधिकारी व पत्रकारांना संघटनात्मक कार्याची नवी दिशा देऊन व्हॉईस ऑफ मीडियाचे कार्य जिल्ह्यात अधिक व्यापक केले जाईल.”

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!