Join WhatsApp group

Ads

मोहता मील परिसरातील जबरी चोरीचा ४८ तासांत छडा; ३३.६२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Sarkarmzanews

September 3, 2026 10:46 am

Ads

अकोला | प्रतिनिधी

मोहता मील परिसरातील ज्येष्ठ दाम्पत्याला लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत हातपाय बांधून सुमारे २६ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लुटल्याच्या जबरी चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत छडा लावला. या कारवाईत एका आरोपीला हैदराबाद येथून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून २०८.९३७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २ लाख २८ हजार १०० रुपये रोख, असा एकूण ३३ लाख ६२ हजार १५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

३१ ऑगस्ट रोजी विजयकुमार रामकरणदास गुप्ता (वय ६७) यांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. गुप्ता हे त्यांच्या गोदामात काम करत असताना काही इसमांनी प्रवेश करून त्यांना व त्यांच्या पत्नीला लोखंडी कोयत्याचा धाक दाखवला. मारहाण करून दोघांचे हातपाय बांधल्यानंतर कपाटातील २२४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४ लाख ५० हजार रुपये रोख असा ऐवज घेऊन आरोपी पसार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

११० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी तीन पथके तयार केली.पथकांनी अकोला शहरासह विविध ठिकाणांवरील ११० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून तपास सुरू ठेवला.

तपासादरम्यान गुप्ता यांच्या दुकानात मागील चार वर्षांपासून काम करणारा सलीमखान गुलखान याच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोहम्मद रफीक मोहम्मद हमजा उर्फ राजा उर्फ गंगा व अन्य एका साथीदारासोबत कट रचल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हैदराबादमध्ये लॉजवर छापा

तपासात मुख्य आरोपी मोहम्मद रफीक मोहम्मद हमजा उर्फ राजा उर्फ गंगा हा चोरीचा मुद्देमाल घेऊन हैदराबादला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांच्या पथकाने तातडीने हैदराबाद गाठले.सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे लॉजची तपासणी केली असता आरोपी एका लॉजमध्ये लपल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली.या प्रकरणातील आणखी एका अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून त्याच्याकडून उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सपोनि गोपाल जाधव, पोउपनि अनिल चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!