Join WhatsApp group

Ads

--

हेल्मेटसक्ती अकोलेकरांसाठी ठरतेय डोकेदुखी, शहरात हेल्मेट सक्तीला स्थगिती द्या! युवक काँग्रेसची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

By Sarkarmzanews

August 12, 2026 4:04 pm

Ads

अकोला : नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती करणे योग्य असले, तरी अकोला शहरातील सध्याची रस्त्यांची अवस्था, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाची परिस्थिती पाहता हेल्मेट सक्ती करणे नागरिकांसाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे शहरातील हेल्मेट सक्तीचा निर्णय तूर्तास बंद करावा, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले.

शहरातील बहुतांश रस्ते अरुंद असून अनेक रस्त्यांची अवस्था वाहन चालविण्यायोग्य राहिलेली नाही. अशा परिस्थितीत वाहनचालकांना वेगाने वाहन चालविणे शक्य नसतानाही केवळ हेल्मेट सक्ती करणे हा सुरक्षेचा पूर्ण उपाय होऊ शकत नाही, असे युवक काँग्रेसने निवेदनात नमूद केले. त्याचबरोबर शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.

फेरीवाले, दुकानांसमोरील साहित्य तसेच बेकायदेशीर पार्किंगमुळे रस्त्याचा मोठा भाग व्यापला जात असल्याने वाहतूक सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होत आहे. सकाळी आणि सायंकाळी शाळा व कार्यालयांच्या वेळेत शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

अशा परिस्थितीत दुचाकीस्वारांना हेल्मेटसह वाहन चालविणेही अनेकदा त्रासदायक ठरते. युवक काँग्रेस कायद्याचे पालन करण्यास तयार आहे; मात्र प्रशासनानेही नागरिकांना सुरक्षित आणि सुस्थितीत रस्ते, योग्य वाहतूक व्यवस्था व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

युवक काँग्रेस हेल्मेट सक्तीच्या विरोधात नसून अकोला शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, अतिक्रमण, बेकायदेशीर पार्किंग आणि वाहतूक कोंडी या सर्व बाबींचा विचार करून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करू नये, अशी भूमिका असल्याचे आकाश कवडे यांनी स्पष्ट केले.

नागरिकांच्या भावनांचा विचार करून प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली. यावेळी पश्चिम विधानसभा अध्यक्ष मो. शारिक, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सारवाण, पूर्व विधानसभा अध्यक्ष अंकुश तायडे, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिजित तवर, विजय जामनिक, शेख अर्शद, तेजस देवबाळे, हर्ष ढोरे, समीर खान यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!