Join WhatsApp group

Ads

राजेंद्र पातोडेंच्या सत्कारातून पुरोगामी एकजुटीचा हुंकार!

By Sarkarmzanews

August 12, 2026 4:01 pm

Ads

शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांच्या चळवळींनी एकत्र येण्याचे आवाहन; स्वराज्याची संकल्पना पुढे नेण्याचा निर्धार

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या राजेंद्र पातोडे यांचा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अकोल्यात जाहीर सत्कार करण्यात आला.

मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमातून पुरोगामी विचारांच्या सामाजिक चळवळींच्या एकजुटीचा संदेश देण्यात आला.शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन व्यापक परिवर्तनाची चळवळ उभी करावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. सत्काराला उत्तर देताना राजेंद्र पातोडे यांनी अठरापगड जाती-धर्मातील समाजघटकांना सोबत घेऊन एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले.

“विचारांची लढाई ही एकट्याची नसून सर्व पुरोगामी शक्तींनी एकत्र येऊन ती लढली पाहिजे,” असा सूर व्यक्त करत पातोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या धर्तीवर सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांवर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांच्या सर्व सामाजिक चळवळींनी हातात हात घालून काम केल्यास महाराष्ट्रासह देशाला पुरोगामी दिशेने नेणे शक्य आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रतिगामी विचारांच्या प्रभावातून समाजाला मुक्त करण्यासाठी व्यापक सामाजिक ऐक्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र कोरडे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रदेश संघटक उत्तमराव माने, प्रदेश सदस्य प्रा. प्रदीप चोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सीमाताई बोके, जिल्हाध्यक्षा रेणुताई गावंडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे सचिव प्रा. संदीप निर्मळ यांनी केले, तर शिवश्री पंकज जायले यांनी प्रास्ताविकातून सत्कार सोहळ्याची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, राजकुमार दामोदर, सचिन शिरोळे यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!