Join WhatsApp group

Ads

‘एक कॅमेरा समाजासाठी’ : मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांचा सुरक्षा उपक्रम

By Sarkar Maza

August 5, 2026 7:15 pm

Ads

मूर्तिजापूर : प्रतिनिधी

कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्री. दिपक महाडिक यांनी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हॉटेल, बार, ढाबा आणि पेट्रोल पंप चालकांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत “एक कॅमेरा समाजासाठी” या उपक्रमाची माहिती देत प्रत्येक आस्थापनाने आपल्या इमारतीच्या बाहेरील परिसरावर लक्ष ठेवणारा किमान एक CCTV कॅमेरा बसवावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी ठाणेदार महाडिक यांनी सांगितले की, प्रत्येक व्यावसायिक आस्थापनाने समाजहिताची जबाबदारी स्वीकारून बाहेरील सार्वजनिक रस्ता, पार्किंग किंवा परिसरावर नजर ठेवणारा कॅमेरा बसविल्यास तो केवळ त्या व्यवसायासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठरेल.

CCTV कॅमेऱ्यांमुळे चोरी, दरोडे, वाहनचोरी, अपघात, मारहाण, संशयित व्यक्तींची हालचाल तसेच इतर गुन्ह्यांचा तपास अधिक जलद आणि प्रभावीपणे करता येतो. अनेक वेळा गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी CCTV फुटेज हा सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरतो. त्यामुळे गुन्ह्यांचा उलगडा वेगाने होण्यास मदत होते.

याशिवाय महामार्गावरील अपघात, हिट-अँड-रनच्या घटना, संशयास्पद वाहने, फरार आरोपींची हालचाल आणि आपत्कालीन परिस्थितीतही CCTV फुटेज पोलिसांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. परिसरात कॅमेरे असल्याची जाणीव असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवरही मानसिक दबाव निर्माण होतो आणि गुन्हे करण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.या उपक्रमाला हॉटेल, बार, ढाबा आणि पेट्रोल पंप चालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आणि व्यापारी यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास सुरक्षित व गुन्हेमुक्त समाज उभारण्यास निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!