Join WhatsApp group

Ads

लढवय्या लोकनेत्याची प्रकृती स्थिर; डॉक्टरांकडून सकारात्मक संकेत

By Sarkar Maza

August 5, 2026 3:40 pm

Ads

राज्याचे माजी क्रीडामंत्री, ज्येष्ठ लोकनेते तथा राष्ट्रीय कबड्डीपटू गुलाबराव गावंडे यांनी आयुष्यभर मैदानावर आणि सार्वजनिक जीवनात अनेक संकटांचा धैर्याने सामना केला. आता अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारालाही त्यांनी जिद्दीने उत्तर दिल्याचे चित्र दिसत आहे. अमरावती येथे मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिर असून समाधानकारक सुधारणा होत असल्याने हजारो कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावंडे हे अमरावती येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेले असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तसेच तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवल्याने त्यांना तातडीने रेनबो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिटीस्कॅनमध्ये मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यूरोसर्जन डॉ. स्वरूप गांधी, डॉ. अजिंक्य जामटे आणि डॉ. श्याम राठी यांच्या तज्ज्ञ पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

सुमारे तीन तास चाललेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूतील रक्तस्त्राव यशस्वीरीत्या नियंत्रणात आणण्यात आला. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.गावंडे यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालयात धाव घेतली. पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच आमदार हरिश पिंपळे, आमदार नितीन देशमुख, खासदार संजय देशमुख आणि आमदार साजिद खान यांनी रुग्णालयात जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी संग्राम गावंडे आणि युवराज गावंडे यांच्याशी संवाद साधून धीर दिला.

कबड्डीच्या मैदानातील योद्धा, जनतेच्या मनातील नेता

राष्ट्रीय कबड्डीपटू म्हणून राज्याचे नाव देशभरात पोहोचवणारे गुलाबराव गावंडे यांनी नंतर राजकारणात प्रवेश करून जनतेशी कायम घट्ट नाळ जपली. राज्याचे क्रीडामंत्री म्हणून त्यांनी क्रीडा क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबवले. साधी राहणी, सर्वसामान्यांशी थेट संवाद आणि कार्यकर्त्यांप्रती असलेला जिव्हाळा ही त्यांची ओळख बनली.

राज्यभरातून प्रार्थना, समर्थकांमध्ये आशेचे वातावरण

गुलाबराव गावंडे यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर पूर्ण सुधारणा व्हावी, यासाठी अकोला, अमरावतीसह राज्यभरातील कार्यकर्ते, हितचिंतक, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून प्रार्थना केली जात आहे. सामाजिक माध्यमांवरही त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. वयाच्या ७४ व्या वर्षीही सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या या ज्येष्ठ नेत्याने या संकटावरही मात करून पुन्हा पूर्ववत जनसेवेत सक्रिय व्हावे, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

“मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना हरवणारा हा लढवय्या नेता, आता आजारालाही जिद्दीने हरवत पुन्हा उभारी घेत आहे,” अशी भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!