Join WhatsApp group

Ads

नगरसेविका घरी, कारभारात ‘पतीराज’ पुढे? मुर्तिजापूर नगरपरिषदेत नवा वाद?

By Sarkar Maza

August 5, 2026 2:52 pm

Ads

मुर्तिजापूर नगरपरिषदेत सध्या ‘पतीराज’चा हस्तक्षेप हा चर्चेचा विषय बनला आहे. नगरपरिषदेतील काही सत्तापक्ष तसेच अपक्ष महिला नगरसेविकांच्या जागी त्यांचे पती विविध कार्यालयीन कामकाज आणि प्रशासकीय बाबींमध्ये पुढाकार घेत असल्याची चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.

याशिवाय काही सत्तापक्ष व अपक्ष नगरसेवकांचे नातेवाईकही नगरपरिषदेच्या कामकाजात सक्रियपणे हस्तक्षेप करत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अधिकृत लोकप्रतिनिधी आणि प्रत्यक्ष कारभार करणाऱ्या व्यक्तींमध्ये फरकच राहिला नसल्याची प्रतिक्रिया काही नागरिक व्यक्त करत आहेत.

यापूर्वीही एका नगरसेवकाने या प्रकाराबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी आक्षेप नोंदविल्याची माहिती समोर आली होती. नगरपरिषदेत नवीन पदाधिकारी आणि सदस्य असल्याने काही काळ परिस्थिती समजून घेत सवलत देण्यात आल्याचीही चर्चा होती. मात्र आता पुन्हा हा विषय ऐरणीवर आला असून ‘पतीराज’चा वाढता प्रभाव हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, काही अधिकारी आणि कर्मचारी यांना अधिकृत लोकप्रतिनिधींऐवजी त्यांच्या नातेवाईकांकडून सूचना किंवा दबाव येत असल्याने प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

आता या संपूर्ण प्रकरणाची दखल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकारी घेणार का? महिला आरक्षणाच्या मूळ उद्देशाला बाधा पोहोचविणाऱ्या अशा कथित प्रकारांची चौकशी होणार का? याकडे मुर्तिजापूरकरांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!