Join WhatsApp group

Ads

अकोला सायबर पोलिसांची गोव्यात धडक; ऑनलाइन फसवणुकीतील ५ आरोपी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

By Sarkar Maza

August 4, 2026 7:34 pm

Ads

टाईल्सच्या व्यवहारात ₹4.19 लाखांची फसवणूक आणि अल्गो ट्रेडिंगच्या आमिषाने महिला डॉक्टरची ₹45.66 लाखांची फसवणूक; अकोला सायबर पोलिसांची मोठी कारवाई

अकोला जिल्हा सायबर पोलिसांनी ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या दोन गंभीर गुन्ह्यांचा छडा लावत गोवा राज्यातून पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, टॅब, मॉनिटर, वाय-फाय राऊटरसह ₹6.27 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ₹5.54 लाखांहून अधिक रक्कम बँक खात्यांमध्ये होल्ड करण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात अकोल्यातील टाईल्सच्या होलसेल व्यापाऱ्याला व्हॉट्सअॅपवर कमी दरात टाईल्स देण्याचे आमिष दाखवून ₹4,19,001 रुपयांची फसवणूक करण्यात आली. तर दुसऱ्या प्रकरणात अकोला शहरातील एका नामांकित महिला डॉक्टरला ‘अल्गो ट्रेडिंग’मध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ₹45,66,750 रुपयांची फसवणूक करण्यात आली.या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सायबर पोलीस स्टेशन, अकोला यांनी तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहारांची पडताळणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केला. तपासादरम्यान आरोपी गोवा राज्यात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर विशेष पथक गोव्याला रवाना करण्यात आले.

कारवाईदरम्यान यशपाल वासुदेवभाई निमावत, सोनू भवर कुमार यादव, देवेंद्र सुरेशचंद्र शर्मा, अंकुर सुरेश चावडा आणि हबीबर रहमान फकरुद्दीन या पाच आरोपींना स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली.सायबर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात आरोपींकडून ₹2.50 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून ₹75 हजारांची रक्कम बँक खात्यात होल्ड करण्यात आली आहे.

तर खदान पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात 23 स्मार्ट मोबाईल, 9 की-पॅड मोबाईल, 1 टॅब, 1 मॉनिटर, 5 वाय-फाय राऊटर आणि इतर साहित्य असा ₹6,27,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ₹4,79,410 रुपये होल्ड करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल माळवे, सपोनि. मनीषा तायडे, पोउनि. देविदास फुलउंबरकर व सायबर पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

ऑनलाइन गुंतवणूक, शेअर मार्केट, कमी दरात माल मिळवून देणे किंवा कमी कालावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in⁠� या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!