Join WhatsApp group

Ads

पक्षांतराच्या अफवा निराधार; विकासकामांसाठीच आमदारांची भेट – वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचे स्पष्टीकरण

By Sarkar Maza

July 11, 2026 1:33 pm

Ads

मूर्तिजापूर | प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीच्या मूर्तिजापूर नगरपरिषदेतील नगरसेवकांनी पक्षांतराच्या सर्व अफवा स्पष्टपणे फेटाळून लावत, आपण पक्षाशी पूर्णतः निष्ठावान असल्याचे सांगितले आहे. विकासकामांसाठीच स्थानिक आमदारांसह विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रसिद्धीस पत्रात दिलेल्या स्पष्टीकरणात नगरसेवकांनी म्हटले आहे की, काही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी अलीकडेच मुंबई दौरा केला तसेच स्थानिक आमदारांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पक्ष बदलत असल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या. मात्र, या अफवांना कोणताही आधार नसून त्यात तथ्य नाही, असे त्यांनी नमूद केले.

नगरपरिषदेत वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृत सहा नगरसेवकांचा गट नोंदणीकृत असून एक स्वीकृत नगरसेवकही पक्षासोबत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी सोडून अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर प्रभाग, समाज आणि शहरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याची जबाबदारी असते. त्यासाठी निधी मिळविणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे तसेच विविध शासकीय आणि अशासकीय अधिकाऱ्यांसह स्थानिक आमदार व नगरपरिषद प्रशासनाच्या भेटी घेणे ही नियमित प्रक्रिया असल्याचेही त्यांनी सांगितले.

नगरसेवकांनी आतापर्यंत नगरपरिषदेत विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर केले असून, त्यामध्ये जे. बी. हिंदी हायस्कूल विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे बंद झाली आहे. तसेच जे. बी. हिंदी शाळेतील उर्दू विभाग, हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या अभावी बंद पडू नये, यासाठी ते अल्पसंख्याकबहुल जुन्या वस्तीत स्थलांतरित करण्याची आणि नगरपरिषद शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेसाठी नवीन इमारत, दुरुस्तीची कामे, मैदानात पेव्हर्स ब्लॉक, शाळेचे डिजिटलायझेशन, कब्रस्तान संरक्षण भिंत, रस्ते व नाली बांधकाम, समाज सभागृह (शादीखाना), घरकुल परिसरातील सेवा गल्लींचे काँक्रीटीकरण आदी विविध विकासकामांचे प्रस्ताव देऊन त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्याविषयी पसरविण्यात येत असलेल्या पक्षांतराच्या अफवा या केवळ राजकीय हेतूने पसरविल्या जात असून त्या पूर्णतः खोट्या असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी केला.

या निवेदनावर गटनेते तसव्वर खान, स्थायी समिती सदस्या कुरेशी शमीन बानो, सदस्य निजामुद्दीन ललकार, सदस्य अ. बाकी, सदस्या सौ. सुनंदा सोलंके आणि सदस्या फहेमिदाबी पटेल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Article

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!