Join WhatsApp group

Ads

स्व. रामकृष्ण कोल्हाळे गुरुजींना संगीतमय आदरांजली

By Sarkar Maza

July 6, 2026 11:01 am

Ads

मूर्तिजापूर (प्रतिनिधी):मूर्तिजापूर येथील समता नगरस्थित महाराष्ट्र संगीत विद्यालयात संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि असंख्य शिष्यांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वर्गीय रामकृष्ण कोल्हाळे गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण संगीतमय आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात मान्यवर, संगीतप्रेमी, गुरुजींचे कुटुंबीय आणि आजी-माजी शिष्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि स्व. रामकृष्ण कोल्हाळे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करून गुरुजींच्या स्मृतींना अभिवादन केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोडम यांनी आपल्या मनोगतात स्व. रामकृष्ण कोल्हाळे गुरुजी यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले, “राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सहवास लाभलेल्या कोल्हाळे गुरुजींनी केवळ संगीताचे शिक्षण दिले नाही, तर मूर्तिजापूरच्या मातीत संगीताचा एक भक्कम वटवृक्ष उभा केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक शिष्य आज विविध क्षेत्रांत संगीताची सेवा करत शहराचे नाव उज्ज्वल करत आहेत.

त्यांचा साधेपणा, संगीतावरील निष्ठा आणि भावी पिढी घडविण्याची तळमळ ही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचा वारसा जपणे आणि पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”यानंतर गुरुजींच्या शिष्यांनी आणि स्थानिक कलाकारांनी भजन, भावगीत तसेच शास्त्रीय गायन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि भावपूर्ण झाले.या कार्यक्रमाला श्याम कोल्हाळे, सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोडम, मुख्याध्यापक सुनील ढोकणे गुरुजी, अक्षय बुऱ्हाने, प्रसाद सूर्यवंशी, सौ. दया सूर्यवंशी, आशुतोष मेहरे, स्नेहलता कोल्हाळे, सौ. तृप्ती कोल्हाळे यांच्यासह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, संगीतप्रेमी, गुरुजींचे कुटुंबीय आणि त्यांचे असंख्य आजी-माजी शिष्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप स्व. रामकृष्ण कोल्हाळे गुरुजी यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या संगीत परंपरेचा वारसा जतन करण्याचा निर्धार व्यक्त करून करण्यात आला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!