Join WhatsApp group

Ads

तारफैल खूनप्रकरणी पोलिसांची झपाट्याने कारवाई; १२ तासांत एक आरोपी जेरबंद

By Sarkar Maza

June 14, 2026 8:30 pm

Ads

अकोला, दि. १४ जून : शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तारफैल परिसरात कौटुंबिक वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत एका आरोपीला अटक करण्यात यश मिळविले असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अंकित नंदागवळी याला कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने मुख्य आरोपी आनंद चवरे याने फोन करून तारफैल येथे बोलावले होते. अंकित तेथे पोहोचताच आनंद चवरे व त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करून त्याची हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर तसेच रामदासपेठचे ठाणेदार पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची तीन विशेष पथके तयार करण्यात आली. आरोपींच्या शोधासाठी तारफैल परिसरासह अकोला शहरातील विविध भाग, रेल्वे स्थानक, बसस्थानक तसेच शेगाव येथील रेल्वे स्टेशन, बसस्थानक, मंदिर परिसर, भक्तनिवास आणि हॉटेल-लॉजेसमध्ये रात्रभर शोधमोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान पोलिसांनी निलेश उर्फ दद्दू विजय बोरकर (वय २६, रा. तारफैल) याला ताब्यात घेऊन अटक केली. प्रकरणातील इतर आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!