Join WhatsApp group

Ads

अकोला LCB ची मोठी कारवाई : ऑटोमधून महिला प्रवाशांचे दागिने व रोकड लांबवणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

By Sarkar Maza

June 14, 2026 10:48 am

Ads

अकोला, दि. १३ जून : अकोला शहरात ऑटो रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या पर्स व बॅगमधील दागिने आणि रोकड चोरी करणाऱ्या यवतमाळस्थित आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.

या कारवाईत एका ऑटो चालकासह सहा महिला आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीची रोकड, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेला ऑटो असा एकूण २ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातील अप.क्र. २१६/२०२६ व २२२/२०२६, रामदासपेठ पोलीस ठाण्यातील अप.क्र. ३८८/२०२६ तसेच खदान पोलीस ठाण्यातील अप.क्र. १०३५/२०२६ असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे २०२६ रोजी अशोक वाटिका ते गांधी रोड दरम्यान ऑटोमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या बॅगेची चैन उघडून दोन अज्ञात महिलांनी सोन्याचे दागिने चोरले होते. त्यानंतर २ जून रोजी अशाच प्रकारे एका महिलेच्या पिशवीतील रोकड लंपास करण्यात आली होती.

या दोन्ही घटनांप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते.या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली की, यवतमाळ येथील एक टोळी अकोला शहरात ऑटोच्या माध्यमातून चोरीच्या घटना घडवत आहे. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खडकी चौक परिसरात नाकाबंदी केली.यावेळी एमएच २९ बीडी २७४६ क्रमांकाचा यवतमाळ पासिंगचा संशयित ऑटो दिसून आला. पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने ऑटो न थांबवता पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून ऑटोला घेराव घालत ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सिद्धार्थ अर्जुन उपाळे (ऑटो चालक), भारती युवराज सकट, बानुबाई मोहन नाडे, मैना विजेंद्र उफाळे, राधा रकीरामा सकट, खुशबू प्रेम सकट आणि काजल राजा हतागळे यांचा समावेश आहे. सर्व आरोपी हे नेताजी नगर, दारव्हा रोड, यवतमाळ येथील रहिवासी आहेत.

चौकशीदरम्यान आरोपींनी विविध चोरीच्या घटनांची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.महिला प्रवाशांना पोलिसांचे आवाहनअकोला पोलिसांनी महिला प्रवाशांना ऑटो किंवा गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तू, दागिने आणि पर्सची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, सपोनि गोपाल जाधव, पोउपनि माजिद पठाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!