Join WhatsApp group

Ads

नवीन ठाणेदारांचे आगमन, पण अवैध धंदे सुरूच? नागरिकांमध्ये चर्चांना उधाण

By Sarkar Maza

June 10, 2026 3:27 pm

Ads

मुर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात नवीन ठाणेदार म्हणून धर्मेंद्र जोशी यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या आगमनानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, वाहतूक शिस्त सुधारेल तसेच अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मात्र, पदभार स्वीकारल्यानंतरही शहरातील काही कथित अवैध धंदे पूर्ववत सुरू असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगत आहे. शहरात पूर्वी जेव्हा नवीन पोलिस निरीक्षक किंवा ठाणेदार रुजू होत असत, तेव्हा विविध अवैध धंद्यांशी संबंधित मंडळी काही दिवसांसाठी तरी सावध भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत असे.

नवीन अधिकाऱ्यांचा सन्मान, त्यांच्या कामकाजाची पद्धत जाणून घेणे आणि संभाव्य कारवाई टाळणे या कारणांमुळे काही काळ अशा हालचालींना ब्रेक लागायचा. मात्र यावेळी असे चित्र फारसे दिसून आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विशेषतः लहरीया प्लॉट परिसरात एका समाज मंदिराचा समोरील घरात हा जुगाराचा अड्डा सुरू असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. या प्रकारामुळे अनेक तरुण सहज पैशाच्या मोहापायी जुगाराकडे आकर्षित होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. जुगाराच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जात असल्याबद्दल पालकवर्गातही चिंता व्यक्त केली जात आहे.

शहरातील तरुण पिढीला व्यसन, जुगार आणि गुन्हेगारी प्रवृत्तींपासून दूर ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!