Join WhatsApp group

Ads

ऑनलाइन-ऑफलाइन दरांतील तफावत दूर करा; ग्राहक पंचायतची मागणी

By Sarkar Maza

June 6, 2026 10:07 am

Ads

देशभरात विविध वस्तूंवर छापण्यात येणाऱ्या कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) धोरणाच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मुर्तिजापूर तालुका शाखेच्या वतीने स्थानिक उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांच्यामार्फत केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक उत्पादक कंपन्या वस्तूंवर अवास्तव व कृत्रिमरीत्या वाढवलेली एमआरपी छापून ग्राहकांना मोठ्या सवलतीचे आमिष दाखवतात. प्रत्यक्षात सवलत दिली जात असली तरी मूळ किंमतच जास्त ठेवण्यात आल्याने ग्राहकांची दिशाभूल होत असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मते, अशा प्रकारच्या व्यवहारामुळे ग्राहकांचा बाजार व्यवस्थेवरील विश्वास कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या हक्कांसाठी देशव्यापी जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून दिल्ली येथे आंदोलनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष प्रभाकर कवठकर, चंदन अग्रवाल, रमेश जैस्वाल, अशोक भावनानी, गौरव बांगड यांच्यासह ग्राहक पंचायतचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

प्रमुख मागण्या :

वस्तूंवर छापण्यात येणाऱ्या अवास्तव व दिशाभूल करणाऱ्या एमआरपीवर नियंत्रण आणावे.

ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत फसव्या एमआरपीविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करावी.

ऑनलाइन व ऑफलाइन विक्रीतील किंमतींमध्ये एकसमान धोरण लागू करावे.

ग्राहक जनजागृतीसाठी व्यापक मोहीम राबवावी.

ग्राहकांच्या हितासाठी एमआरपी व्यवस्थेत पारदर्शकता आणून फसवणुकीला आळा घालण्याची मागणी ग्राहक पंचायतने निवेदनाद्वारे केली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!