Join WhatsApp group

Ads

वर्षभरापासून फरार असलेला आरोपी अकोल्यात जेरबंद; अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा

By Sarkar Maza

June 6, 2026 10:01 am

Ads

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी तब्बल एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अकोला जिल्हा पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे.

या कारवाईत पीडित मुलीचाही शोध घेण्यात आला असून दोघांना पुढील कारवाईसाठी पातूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पातूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १८४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पुढील कार्यवाहीसाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, अकोला यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता.तपासादरम्यान पथकाने आरोपी व पीडितेचा शोध घेण्यासाठी पुणे, मुंबई आणि नाशिक येथे शोधमोहीम राबविली. मात्र त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. दरम्यान, आरोपी आणि पीडिता वाशिम बायपास चौक, अकोला परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. आशापुरी हॉटेलसमोर एक युवक व युवती संशयास्पद हालचाली करताना दिसून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता युवकाने आपले नाव गौतम बाबुराव जाधव (वय २२, रा. कळंबेश्वर, पोस्ट निंबी मालोकार, ता. जि. अकोला) असे सांगितले. पडताळणीअंती हे दोघेही संबंधित गुन्ह्यातील आरोपी व पीडिता असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, अकोला येथे आणण्यात आले. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आरोपी व पीडितेला पातूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.अकोला जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता फुसे, महिला पोलीस हवालदार गीता अवचार, पोलीस हवालदार विशाल मोरे, वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ यादव आणि सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार राहुल सानप यांनी सहभाग घेतला.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने आतापर्यंत महिला व बालकांवरील अत्याचाराशी संबंधित १३४ गुन्ह्यांचा छडा लावला असून अशा प्रकरणांतील आरोपींचा शोध घेण्याचे अभियान पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!