Join WhatsApp group

Ads

खाकीवर काळा डाग! महिलेच्या शोषणप्रकरणी पोलीस शिपाई गजाआड

By Sarkar Maza

May 25, 2026 6:47 am

Ads

अकोला : समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर असलेल्या खाकी वर्दीवरच काळिमा फासणारी धक्कादायक घटना अकोल्यात उघडकीस आली आहे. अकोला येथील मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेला पोलीस शिपाई सचिन केशव गायकवाड याच्याविरुद्ध एका महिलेने लग्नाचे खोटे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची, मानसिक छळ केल्याची तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची गंभीर तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. सिटी कोतवाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अप.क्र. २०८/२०२६ अन्वये बीएनएस कलम ६९, ३५२, ३५१ (२)(३) अंतर्गत गंभीर गुन्हा नोंदवून आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली.

विशेष म्हणजे, कायद्याचे ज्ञान आणि जबाबदारी असतानाही संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करत महिलेची फसवणूक केल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाकडे अत्यंत गंभीरतेने पाहिले जात आहे. एका सामान्य नागरिकाने असा गुन्हा केला असता तर तो गंभीरच ठरला असता, मात्र कायद्याचे रक्षण करणाऱ्यानेच कायद्याची पायमल्ली केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

सदर प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय गवई यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी कठोर भूमिका घेत संबंधित पोलीस शिपायाला दिनांक २३ मे २०२६ पासून तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित केले.

पोलीस दलातील शिस्त, नैतिकता आणि जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. महिलांविरुद्ध अत्याचार, फसवणूक किंवा गैरवर्तन करणाऱ्याला तो कोणत्याही पदावर असो, कायद्यापुढे झुकावेच लागेल, अशी ठाम भूमिका पोलीस प्रशासनाने घेतली आहे.

या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, समाजात महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. “रक्षकच भक्षक बनला तर महिलांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!