Join WhatsApp group

Ads

जंगलातील दुहेरी मृत्यूचे गूढ अखेर उलगडले : पोलिस तपासात मोठा ट्विस्ट

By Sarkar Maza

May 13, 2026 10:25 am

Ads

बार्शीटाकळी : बार्शीटाकळी तालुक्यातील बिहाडमाथा शेतशिवार परिसरात घडलेल्या दुहेरी मृत्यू प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला होता. महान धरणाजवळील जंगलात निंबाच्या झाडाला एकाच दोरीच्या साहाय्याने दोन व्यक्तींचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सुरुवातीला खळबळ उडाली होती. हा अपघात, घातपात की आत्महत्या? याबाबत अनेक तर्क-वितर्क रंगत असतानाच आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.

मृतकांची ओळख किशोर बळीराम सोनटक्के (वय ४०, रा. कानडी ता. मुर्तिजापूर) आणि किशोर मारोती बोडखे (वय ६०, रा. चरुद्र ता. मंगरूळपीर) अशी झाली. विशेष म्हणजे दोघेही ९ मेपासून बेपत्ता होते.

त्यांच्या कुटुंबीयांनी संबंधित पोलीस ठाण्यांत मिसिंगची नोंदही केली होती.दरम्यान, मृतक किशोर सोनटक्के यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या भाच्याला व्हॉट्सअॅपवर एक चिठ्ठी पाठवल्याची माहिती समोर आली. त्या मेसेजनंतर नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असता जंगलातील भयावह दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.

तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे अनेक धागेदोरे समोर येऊ लागले. मृतकांनी नातेवाईकांना केलेले शेवटचे कॉल, व्हॉट्सअॅपवरील संदेश आणि घटनास्थळावरील परिस्थिती यामुळे संशय अधिक गडद झाला होता.अखेर तपासादरम्यान मृतक किशोर सोनटक्के यांच्या खिशातून सापडलेल्या मृत्यूपूर्व चिठ्ठीने संपूर्ण प्रकरणाचे गूढ उलगडले.

त्या चिठ्ठीत निलेश मोतीराम चौधरी आणि पूजा निलेश चौधरी यांच्या मानसिक छळ, धमक्या आणि त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा गंभीर उल्लेख करण्यात आला होता.या धक्कादायक खुलाशानंतर बार्शीटाकळी पोलिसांनी अप. क्र. ३९४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी निलेश मोतीराम चौधरी याला अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि बाळू पवार हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Photo – AI GENRATED

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!