Join WhatsApp group

Ads

“ईमानदारी अजून जिवंत! सापडलेले पैसे मालकाला परत करून दिला माणुसकीचा संदेश”

By Sarkar Maza

May 12, 2026 6:35 pm

Ads

मूर्तिजापूर प्रतिनिधी :
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी युगातही समाजात ईमानदारी जिवंत असल्याचे दर्शन मूर्तिजापूर शहरात घडलेल्या एका घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले. रस्त्यावर पडलेली २० हजार रुपयांची रक्कम दोन युवकांनी प्रामाणिकपणे सिटी पोलिस ठाण्यात जमा करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.

माहितीनुसार, स्टेशन विभागातील रहिवासी सचिन मालानी यांनी स्थानिक मुख्य रस्त्यावरील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून प्रत्येकी २० हजार रुपये अशा पाच वेळा रक्कम काढली होती. ही रक्कम खिशात ठेवून ते दुचाकीने घरी जात असताना त्यांच्या खिशातून एक गड्डी रस्त्यावर पडली. मात्र, त्यांना याची कोणतीही कल्पना न आल्याने ते थेट घरी पोहोचले.

दरम्यान, जुनी वस्ती परिसरातील शाम जोशी आणि अंकुश अग्रवाल हे दुचाकीने त्या मार्गाने जात असताना बँकेपासून काही अंतरावर रस्त्यावर पडलेली रक्कम त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ आजूबाजूच्या नागरिकांसमोर रक्कम मोजून कोणताही मोह न बाळगता ती थेट सिटी पोलिस ठाण्यात जमा करण्याचा निर्णय घेतला.

दोघांनी संपूर्ण रक्कम सिटी पोलिस ठाण्यात जमा करून प्रामाणिकपणाचे उदाहरण समाजासमोर ठेवले. याच दरम्यान, घरी पोहोचल्यानंतर सचिन मालानी यांच्या लक्षात आले की, आपल्या जवळील रक्कम कमी आहे. त्यामुळे ते घाबरलेल्या अवस्थेत पुन्हा संपूर्ण रस्त्यावर चौकशी करत बँकेकडे पोहोचले. तेथे उपस्थित नागरिकांनी त्यांना दोन युवकांना पैसे सापडल्याची व त्यांनी ती रक्कम सिटी पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी नेल्याची माहिती दिली.

यानंतर सचिन मालानी यांनी तात्काळ सिटी पोलिस ठाणे गाठले. त्या वेळी अंकुश अग्रवाल आणि शाम जोशी हे पोलिसांसमोर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करत होते. पोलिस निरीक्षक अजित जाधव, एएसआय मुन्ना पांडे यांच्या उपस्थितीत आवश्यक शहानिशा करून सदर रक्कम सचिन मालानी यांना परत करण्यात आली.

हरवलेली रक्कम सुखरूप परत मिळाल्यानंतर सचिन मालानी यांनी संबंधित युवकांसह पोलिसांचे आभार मानले. पैसे परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आनंदाचे स्मित उमटले.

या घटनेमुळे समाजात अजूनही माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!