Join WhatsApp group

Ads

‘सरकार माझा न्यूज’ची बातमी ठरली निर्णायक; दुसरा दरबार बंद,चेतन महाराज भोंदू बाबावर गुन्हा

By Sarkar Maza

April 23, 2026 1:12 pm

Ads

मुर्तिजापूर (प्रतिनिधी) — अंधश्रद्धा पसरवत लहान मुलांवर अमानुष कृत्य करणाऱ्या भोंदू बाबावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमागे *‘सरकार माझा न्यूज’*च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर सर्वच माध्यमांनी हा मुद्दा जोरदारपणे उचलून धरला, परिणामी पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले.

पोलिस स्टेशन मुर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील ग्राम निंभा येथील चेतन सुनिल मुळे (वय २४) याची काही दिवसांपूर्वी धक्कादायक व्हिडिओ बातमी सरकार माझा न्यूजने सर्वप्रथम प्रकाशित केली होती.

या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करत ‘दरबार’ भरवत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी लहान मुलांना त्यांच्या कपड्यांना तोंडाने पकडून फिरविण्याचा अमानुष प्रकार केला जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

या गंभीर प्रकाराची दखल घेत बाल कल्याण समिती, अकोला येथील सदस्य प्रांजली मनोज जैस्वाल (रा. अकोला) यांच्या फिर्यादीवरून मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी चेतन मुळे याच्याविरुद्ध अप. क्र. १८९/२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १२५ सह बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम ७५ (बालकांवरील क्रूरता) तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत (अंधश्रद्धा पसरवणे व अमानुष कृत्य) कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई मा. अर्चित चांडक (पोलीस अधीक्षक, अकोला), बी. चंद्रकांत रेड्डी (अपर पोलीस अधीक्षक), वैशाली मुळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, मुर्तिजापूर), तसेच शंकर शेळके (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पुढील तपास ठाणेदार श्रीधर जी. गुठ्ठे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि चंदन वानखडे, मपोउपनि मनिषा सामटकर, पोहेकॉं राजेश डोंगरे, पोकॉं रितेश मददी, शंकर खेडकर आदी अधिकारी करीत आहेत.

दरम्यान, *‘सरकार माझा न्यूज’*ने सर्वप्रथम हा प्रकार उघडकीस आणत सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर इतर माध्यमांनीही हा मुद्दा लावून धरल्याने प्रशासनावर दबाव निर्माण झाला आणि अखेर पोलिसांनी कारवाई करत भोंदू बाबाला दणका दिला आहे. या घटनेमुळे अंधश्रद्धेविरोधात पुन्हा एकदा कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!