Join WhatsApp group

Ads

मुर्तिजापूर पोलिस उपविभागाचे वार्षिक निरीक्षण संपन्न,एसपी अर्चित चांडक यांचा आढावा

By Sarkar Maza

April 21, 2026 5:11 pm

Ads

मुर्तिजापूर : उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, मुर्तिजापूर येथे वार्षिक निरीक्षण कार्यक्रम शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते हे निरीक्षण करण्यात आले असून, यावेळी संपूर्ण उपविभागातील पोलिस यंत्रणेच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला.

निरीक्षणादरम्यान कार्यालयातील अभिलेख, नोंदवही, गुन्हे नोंदणी प्रक्रिया, तपासाची प्रगती, प्रलंबित प्रकरणे तसेच विविध प्रशासकीय बाबींची तपासणी करण्यात आली. तसेच कार्यालयीन शिस्त, दस्तऐवजांची अचूकता व अद्ययावत नोंदी यावर विशेष भर देण्यात आला. परिसर निरीक्षण करून स्वच्छता, सुरक्षितता आणि नागरिकाभिमुख सुविधा यांची पाहणीही करण्यात आली.

यानंतर उपविभागातील सर्व पोलिस ठाण्यांच्या ठाणेदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना, गुन्हेगारीवर नियंत्रण, महिला व बालकांवरील गुन्ह्यांबाबत संवेदनशीलता, तसेच सायबर गुन्ह्यांविरोधात प्रभावी कारवाई यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रलंबित गुन्ह्यांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश देत तपास प्रक्रियेत गती आणण्यावर भर देण्यात आला.

तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्क राहून बंदोबस्ताचे नियोजन प्रभावीपणे राबवावे, नागरिकांशी समन्वय ठेवावा व विश्वासार्हता वाढवावी, अशा सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या.

या निरीक्षणावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्धता व कार्यक्षमतेवर भर देण्यात आला असून, या निरीक्षणामुळे उपविभागातील पोलिस कामकाज अधिक गतिमान व परिणामकारक होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!