Join WhatsApp group

Ads

रुग्णालयातच बेपर्वाईचा कळस; ठेकेदार-अधिकाऱ्यांवर संशयाची सुई – आमदार पिंपळेचा अल्टिमेटम

By Sarkar Maza

April 4, 2026 8:37 pm

Ads

मुर्तीजापुर उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या बांधकाम कामांमध्ये गंभीर दर्जाहीनतेचा प्रकार उघडकीस आला असून संपूर्ण परिसरात अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. शासनाच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या रुग्णालयातच अशा प्रकारचे निकृष्ट काम होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, स्वच्छतेसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले नाली बांधकामच निकृष्ट पद्धतीने केल्यामुळे सांडपाणी साचणे, दुर्गंधी पसरने आणि रुग्णालयाच्या परिसरात अस्वच्छतेचे प्रमाण वाढणे, असे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना या परिस्थितीचा थेट त्रास सहन करावा लागत असून प्रशासन मात्र ‘सायलेंट मोड’मध्ये असल्याची चर्चा रंगली आहे.

या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत आमदार हरीश पिंपळे यांनी थेट उप अभियंता पटारिया यांना व्हिडिओ कॉल करून प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली. कॉलदरम्यानच त्यांनी कामाच्या निकृष्ट दर्जावर संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. “जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी सहन केली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी आमदार पिंपळे यांनी बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराला स्पष्ट शब्दांत ८ दिवसांच्या आत संपूर्ण काम उच्च दर्जात पूर्ण करण्याचा कडक अल्टिमेटम दिला. अन्यथा संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरत असून “अधिकारी उंटावर बसून शेळ्या हाकत आहेत” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. कामाच्या दर्जावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असतानाही अधिकारी निष्क्रिय असल्याचा आरोप होत आहे.

जनतेच्या कराच्या पैशातून होणाऱ्या कामांमध्ये कथित कमिशनखोरीसाठी दर्जाशी तडजोड केली जात असल्याचा गंभीर आरोपही या निमित्ताने पुढे आला आहे. विशेष म्हणजे, खाजगी कामांच्या तुलनेत शासकीय कामांसाठी दुप्पट ते तिप्पट निधी उपलब्ध होत असतानाही अशा सामाजिक उपक्रमांच्या ठिकाणीच भ्रष्टाचाराचे सावट का दिसते, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

अधिक निधी मिळूनही दर्जाहीन कामे होणे हे केवळ निष्काळजीपणाचे नव्हे तर संगनमताचे लक्षण असल्याचा आरोपही आता जोर धरत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!