Join WhatsApp group

Ads

घरगुती वादातून गळा आवळून काकाचा खून वहिनी व पुतण्याकडूनच; काही तासांत माना पोलिसांकडून गुन्ह्याचा उलगडा

By Sarkar Maza

March 28, 2026 11:18 am

Ads

मूर्तीजापूर (प्रतिनिधी) :
तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम वाई (माना) येथे घडलेल्या एका धक्कादायक खून प्रकरणाचा काही तासांत उलगडा करत माना पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. काकाचा खून हा घरच्याच वहिनी आणि पुतण्याने केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोपाल रामकृष्ण भटकर (वय ४७) यांनी दि. २६ मार्च रोजी माना पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली. त्यांना सकाळी त्यांच्या पुतण्या स्वप्नील याचा फोन आला होता की, “संजय काका मरण पावले आहेत.” ही माहिती मिळताच ते वाई (माना) येथे पोहोचले. सुरुवातीला मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्यात आले.

मात्र, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालय, मूर्तीजापूर येथे पाठविला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालात “गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू (Asphyxia due to strangulation)” झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रकरणाने गंभीर वळण घेतले.

यानंतर माना पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. गुप्त माहितीच्या आधारे मृतकाची वहिनी संगीता विनोद भटकर (वय ४८) व पुतण्या स्वप्नील विनोद भटकर (वय २५) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरगुती वादातून संजय भटकर यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.

दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेष्ट्री, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ठाणेदार गणेश नावकार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

दरम्यान, नातेसंबंधातील वैमनस्य इतक्या टोकाला जाऊन थेट खुनापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीती व संताप व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!