Join WhatsApp group

Ads

सोनाळा ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहाराचा संशय; सरपंच-सचिवांविरोधात चौकशीची मागणी

By Sarkar Maza

March 16, 2026 11:43 am

Ads

अकोला | दि. १६ मार्च : प्रतिनिधी :अकोला जिल्ह्यातील सोनाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर संशयाची सावली पडली असून सरपंच व ग्रामसेवक (सचिव) यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा संतोष उके यांनी या संदर्भात जिल्हा परिषद अकोला येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देत ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.तक्रारीनुसार, ३१ जानेवारी २०२४ पासून ग्रामपंचायतीच्या निधीच्या प्राप्ती व खर्चाच्या नोंदींमध्ये तफावत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच रोखपुस्तक, बँक पासबुक व ताळमेळ पत्रकातील आकडेवारीत विसंगती असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.तक्रारदारांच्या मते, काही विकासकामांच्या अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका (MB) आणि पूर्णत्व प्रमाणपत्रांमध्ये फरक आढळत असल्याची शक्यता आहे. तसेच मनरेगा व इतर योजनांतील काही कामांचे मूल्यमापन काम पूर्ण होण्यापूर्वीच केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

याशिवाय साहित्य खरेदीतील बिलांमध्ये अनियमितता, घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत अपारदर्शकता तसेच ग्रामसभेच्या ठरावांमध्ये फेरफार झाल्याची शक्यता तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

या सर्व बाबींची स्वतंत्र चौकशी अधिकारी नेमून कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी लवकर कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन किंवा आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे. त्यामुळे सोनाळा ग्रामपंचायतीतील कथित अनियमिततेवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!