Join WhatsApp group

Ads

“कमर्शियल गॅसवर काळा बाजाराचा स्फोट गॅस सिलेंडर २८०० रुपयांना!”

By Sarkar Maza

March 16, 2026 11:08 am

Ads

मुर्तिजापूर : प्रतिनिधी :मुर्तिजापूर शहरात एका गॅस एजन्सीकडून व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडरचा सर्रास काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त किंमत आकारून चक्क २८०० रुपयांना व्यावसायिक गॅस सिलेंडर विकला जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

त्यामुळे छोटे हॉटेल व्यावसायिक, ढाबे आणि फूड स्टॉल चालक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काही व्यावसायिकांना अधिकृत दरापेक्षा जास्त पैसे मोजावे लागत असून “सिलेंडर पाहिजे असेल तर २८०० रुपये द्या, नाहीतर थांबा” असा अलिखित नियमच एजन्सीने लागू केल्याचा आरोप केला जात आहे. परंतु तुटवडा असल्यामुळे तक्रार करण्यास लोक टाळाटाळ करत आहे.

परिणामी लहान व्यावसायिकांना पर्याय नसल्याने जास्तीचे पैसे देऊन सिलेंडर घ्यावे लागत असल्याचे सांगितले जाते.

विशेष म्हणजे, गॅस सिलेंडरच्या दरांवर केंद्र सरकार व तेल कंपन्यांचे नियंत्रण असताना मुर्तिजापूरात मात्र नियमांना हरताळ फासून मनमानी दर आकारले जात आहे. यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी आणि पुरवठा विभागाच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांच्या मते, “शहरात इतक्या उघडपणे काळाबाजार सुरू असताना प्रशासनाला याची माहिती नाही का? की सगळं काही माहिती असूनही दुर्लक्ष केलं जातंय?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.दरम्यान, या प्रकारामुळे ग्राहक संरक्षण कायदा आणि आवश्यक वस्तू अधिनियमाचे उल्लंघन होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर मोठा गॅस घोटाळा समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.आता जिल्हा पुरवठा अधिकारी आणि प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करणार का, की सर्व काही “ठीक आहे” म्हणत डोळेझाक केली जाणार? असा प्रश्न मुर्तिजापूरकरांच्या मनात निर्माण झाला आहे.

गरज आहे ती तत्काळ चौकशी करून संबंधित एजन्सीवर कडक कारवाई करण्याची, अन्यथा मुर्तिजापूर शहरात व्यावसायिक गॅसचा काळाबाजार अधिकच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!