Join WhatsApp group

Ads

--

लाखोंच्या ‘लक्ष्मीदर्शनानंतर’ गुटखा माफियाला ‘वीर’ प्रमाणपत्र? लदनिया कंपाऊंड धाड संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईऐवजी शांत माघार, शहरात चर्चांना उधाण

By Sarkar Maza

March 8, 2026 10:46 pm

Ads

अकोला : दिनांक ०८ : शहरातील दगडीपूल परिसरात काल सायंकाळी लदनिया कंपाऊंड येथे गुटख्याच्या मोठ्या साठ्यावर टाकण्यात आलेली धाड काही तासांतच संशयास्पदरीत्या गुंडाळण्यात आल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे. लाखोंचा मुद्देमाल समोर असतानाही कोणतीही अधिकृत कारवाई न करता अधिकारी मंडळी तेथून निघून गेल्याने “लक्ष्मी दर्शनानंतरच सर्व काही शांत झाले का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

photo – AI generated

मिळालेल्या माहितीनुसार, लदनिया कंपाऊंड परिसरात गुटखा माफिया याने मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करून ठेवला असल्याची खात्रीलायक माहिती संबंधित यंत्रणेला गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे रविवारी अचानक एका अधिकाऱ्याने आपल्या विश्वासातील कर्मचाऱ्यासह त्या ठिकाणी धाड टाकली.

मात्र, प्रत्यक्ष ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळूनही आश्चर्यकारकपणे कोणतीही अधिकृत जप्ती करण्यात आली नाही, तसेच गुन्हाही दाखल करण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे. काही काळ बंद दरवाज्याआड चर्चा झाल्यानंतर अधिकारी मंडळी शांतपणे तेथून निघून गेल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.

या घटनेनंतर शहरातील गुटखा व्यापाऱ्यांमध्ये मात्र वेगळीच कुजबुज ऐकू येत आहे. “लाखोंचे लक्ष्मी दर्शन झाल्यानंतरच धाड गुंडाळण्यात आली,” अशी चर्चा व्यापारी वर्तुळात रंगली असून त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई न करता गुटखा माफियालाच जणू ‘वीर’ प्रमाणपत्र दिल्याची उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही शहरात मोठ्या प्रमाणात साठा आणि विक्री होत असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत आहेत. मात्र अशा धाडीनंतरही जर ठोस कारवाई होत नसेल, तर “गुटखा माफियांच्या पाठीशी नेमके कोणाचे संरक्षण आहे?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही माहिती देण्यात आलेली नसून संबंधित विभागाकडून मौन बाळगले जात असल्याने संशय अधिकच गडद होत आहे. शहरात मात्र एकच चर्चा रंगली आहे — “धाड पडली खरी… पण शेवटी ‘वीर’ कोण ठरले?”

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!