Join WhatsApp group

Ads

---

लाखपुरी येथे शेतातून ४२ हजारांची तूर चोरी; ठाणेदारांसह पोलिसांची घटनास्थळी पाहणी

By Sarkar Maza

February 27, 2026 7:22 pm

Ads


मुर्तिजापूर ग्रामीण (ता. मुर्तिजापूर, जि. अकोला), दि. २७ फेब्रुवारी २०२६ :


लाखपुरी शिवारातील शेतातून ४२ हजार रुपये किमतीची तूर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.


तक्रारदार पुरुषोत्तम केशवराव धनमुळे (वय ५७, रा. लाखपुरी) यांची गट क्रमांक १७० मध्ये सुमारे ७ एकर शेती आहे. त्यांनी शेतात सोयाबीन व तूर पिकाची लागवड केली होती. तूर काढणीनंतर सुमारे एक हजार पेंड्यांची गंजी लावण्यात आली होती. दि. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंत सर्व पेंड्या सुरक्षित होत्या. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेल्यानंतर गंजीतील सुमारे ३०० पेंड्या तूर चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेली तूर अंदाजे ६ क्विंटल असून बाजारभावानुसार तिची किंमत सुमारे ४२ हजार रुपये आहे.


घटनेची माहिती मिळताच मुर्तिजापूर ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसराची पाहणी करून पुरावे संकलित करण्यात आले असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,


“घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून तपास सुरू आहे. परिसरातील माहितीदारांकडून व तांत्रिक साधनांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. लवकरात लवकर आरोपींचा शोध घेण्यात आम्हाला यश येईल.”


दरम्यान, ग्रामीण भागात शेतमाल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढवून आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!