Join WhatsApp group

Ads

---

लॉरेन्स बिश्नोई गँगकडून आमदार साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी; ‘झेड प्लस’ सुरक्षेची मागणी : विधानसभेत चर्चा

By Sarkar Maza

February 27, 2026 8:18 am

Ads

अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना कुख्यात ‘लॉरेन्स बिश्नोई’ गँगकडून तब्बल दहा कोटी रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणाची जोरदार चर्चा गुरुवारी विधानसभेत झाली. “दहा कोटींची व्यवस्था नाही केली तर तुझी बाबा सिद्दीकीसारखी हत्या करू,” असा थेट इशारा देण्यात आल्याने राज्यातील राजकीय आणि सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

या संदर्भात गँगस्टर शुभम लोणकर याने फोन करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत सरकारकडे आ. पठाण यांना तात्काळ ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याची आणि धमकी देणाऱ्या आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी केली.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “ज्या दिवशी आ. साजिद खान पठाण यांना धमकीचा कॉल आला, त्याच दिवशी मी त्यांच्याशी संपर्क साधला. अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांना तातडीने आवश्यक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

आ. पठाण यांना संपूर्ण पोलिस संरक्षण देण्याचे आदेश गृह विभागाला देण्यात आले आहेत.”

फडणवीस पुढे म्हणाले, “शुभम लोणकर हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती सध्या फरार असला तरी त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आमदारांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवत, एका विद्यमान आमदाराला थेट खंडणीची धमकी दिली जाणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले. सभागृहात या मुद्द्यावरून वातावरण तापले होते.दरम्यान, आ. पठाण यांच्या सुरक्षेची जबाबदारी गृह विभागाने स्वीकारली असून “त्यांना कोणतीही हानी होऊ दिली जाणार नाही,”

अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आता आरोपीच्या अटकेकडे आणि वाढीव सुरक्षेच्या अंमलबजावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!