Join WhatsApp group

Ads

-

मूर्तीजापूरात २५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

By Sarkar Maza

February 18, 2026 9:25 am

Ads

मूर्तीजापूर : दिनांक १८ : शहरातील जुनीवस्ती परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वैभव सुनील डूडूल (वय अंदाजे २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून मूर्तीजापूर शहर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैभव हा आपल्या कुटुंबासोबत जुनीवस्ती वकीलपुरा भागात राहत होता. १७ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १.३० वाजताच्या सुमारास त्याने राहत्या घरातच गळफास घेतला. काही वेळाने ही बाब घरातील सदस्यांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी तातडीने त्याला खाली उतरवून खासगी वाहनाने रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच मूर्तीजापूर शहर पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत पंचनामा प्रक्रिया केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून कुटुंबीय व नातेवाईकांची चौकशी सुरू आहे.

वैभव हा तरुण वयातच जगाचा निरोप घेतल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवारातही हळहळ व्यक्त केली जात आहे. नेहमीप्रमाणे वावरणारा वैभव अचानक असे पाऊल उचलेल यावर अनेकांचा विश्वास बसत नाही.

दरम्यान, आर्थिक अडचण, वैयक्तिक कारणे की अन्य काही कारण या टोकाच्या निर्णयामागे आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. घटनेचा पुढील तपास मूर्तीजापूर शहर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!