Join WhatsApp group

Ads

--

लाखो रुपये खर्चूनही सुविधा धुळखात; दुर्गंधीच्या विळख्यात आठवडी बाजार, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू!

By Sarkar Maza

February 13, 2026 7:31 pm

Ads

मुर्तिजापूर : दिनांक १३:

आज आठवडी बाजाराच्या दिवशी शहरातील बाजार परिसरात गंभीर आरोग्यविषयक प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे.

नगरपरिषदेने मटण व चिकन विक्रेत्यांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करून स्वतंत्र व नियोजित जागा उभारली असतानाही त्या ठिकाणी एकही विक्रेता दिसून आला नाही. परिणामी बाजार परिसरात अनियंत्रितपणे लागणाऱ्या मटण-चिकन दुकानांमुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्य धोक्यात येत असल्याची नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

बाजारात प्रवेश करताच मटण आणि चिकन दुकानांमधून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीने नागरिकांचे स्वागत होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. उघड्यावर मांस विक्री, योग्य कचरा व्यवस्थापनाचा अभाव, सांडपाणी आणि रक्ताचे अवशेष यामुळे परिसरात माश्या, कुत्री आणि इतर प्राणी मोठ्या प्रमाणात फिरताना दिसतात. यामुळे संसर्गजन्य आजार, अन्न दूषित होण्याचा धोका तसेच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे क्रीडा संकुलाच्या पाठीमागील भागात मोठ्या प्रमाणात मटण-चिकन दुकाने लागत असल्याने खेळाडूंना सराव करताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

स्वच्छ वातावरणात खेळ व व्यायाम करणे आवश्यक असताना अशा परिस्थितीमुळे खेळाडूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता पालक आणि क्रीडा प्रेमींनी व्यक्त केली आहे.

नगरपरिषदेने विक्रेत्यांसाठी उभारलेली सुविधा नेमकी का वापरात आणली जात नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. नियोजनाचा अभाव, प्रशासनाची उदासीनता की अंमलबजावणीतील त्रुटी यामुळे लाखो रुपयांचा खर्च वाया जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

आरोग्य विभाग आणि नगरपरिषद प्रशासनाने संयुक्तपणे तपासणी करून मटण-चिकन विक्रीसाठी स्वच्छ, नियोजित आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षित व्यवस्था तातडीने लागू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सध्या तरी आठवडी बाजारात नागरिकांना खरेदीसोबत दुर्गंधी आणि अस्वच्छतेलाही सामोरे जावे लागत असून, आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!