Join WhatsApp group

Ads

-

चीनची वैद्यकीय क्षेत्रात क्रांती; त्वचेखालील नसांचा रंगीत नकाशा दाखवणारे अत्याधुनिक उपकरण विकसित

By Sarkarmzanews

January 28, 2026 9:17 am

Ads

न्यूज डेस्क: दिनांक २८ :चीनने वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. एका नामांकित चिनी मेडिकल टेक्नोलॉजी कंपनीने रिअल-टाइम व्हॅस्क्युलर इमेजिंग डिव्हाइस विकसित केले असून, या उपकरणाच्या मदतीने मानवी त्वचेखालील नसांचा रंगीत नकाशा थेट स्क्रीनवर स्पष्टपणे पाहता येतो. त्यामुळे इंजेक्शन देणे, सलाईन लावणे तसेच रक्तनमुना घेण्याची प्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित आणि जलद होणार आहे.

या अत्याधुनिक उपकरणामध्ये इन्फ्रारेड लाईट आणि उच्च दर्जाच्या सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हातावर किंवा शरीराच्या इतर भागावर विशेष प्रकाश टाकताच रक्तवाहिन्यांची रचना रंगीत स्वरूपात दिसून येते. ही संपूर्ण प्रक्रिया वेदनामुक्त असून कोणत्याही प्रकारची सुई टोचण्याची गरज नसते.

त्यामुळे रुग्णाला मानसिक व शारीरिक त्रास होत नाही.विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक, मधुमेहाचे रुग्ण, लठ्ठ व्यक्ती तसेच ज्या रुग्णांच्या नस शोधणे कठीण जाते, त्यांच्यासाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

अनेक वेळा चुकीच्या ठिकाणी सुई टोचली जात असल्याने वेदना, सूज किंवा रक्तस्राव होतो. मात्र या नव्या तंत्रज्ञानामुळे अशा चुका टाळता येणार आहेत.वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, या उपकरणामुळे उपचारासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. परिचारिका व डॉक्टरांचे काम सुलभ होईल आणि रुग्णसेवेची गुणवत्ता वाढेल.

तसेच आपत्कालीन परिस्थितीतही हे उपकरण महत्त्वाची भूमिका बजावू शकते, कारण वेळेची बचत हा उपचारातील सर्वात मोठा घटक असतो.चीन सरकारकडून वैद्यकीय संशोधन व नव्या तंत्रज्ञानाला सातत्याने प्रोत्साहन दिले जात असून, याच धोरणातून अशा संशोधनाला चालना मिळत आहे.

भविष्यात हे उपकरण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच मोबाईल मेडिकल युनिटमध्येही वापरात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.चीनची ही नवी वैद्यकीय कामगिरी विज्ञान आणि तंत्रज्ञान आरोग्यसेवा कशा अधिक आधुनिक व मानवकेंद्री बनवत आहेत, याचे ठळक उदाहरण आहे.

येत्या काळात अशा तंत्रज्ञानामुळे उपचारांची पद्धत अधिक सुलभ, सुरक्षित आणि परिणामकारक होईल, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!