Join WhatsApp group

Ads

-

“नगराध्यक्षांना फक्त सत्कार दिसतोय का?”वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तसवर खान यांचे नगराध्यक्ष हर्षल साबळे यांना थेट सवाल

By Sarkarmzanews

January 22, 2026 11:21 am

Ads

मुर्तिजापूर : दिनांक २२ :

मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीनंतर सत्तास्थापना झाली, नगराध्यक्षपदाची जबाबदारी हर्षल साबळे यांच्याकडे आली; मात्र सत्तेची सूत्रे हातात येऊनही शहरातील मूलभूत प्रश्नांकडे नगराध्यक्षांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते तसवर खान यांनी केला आहे.

“नगराध्यक्ष हर्षल साबळे यांनी सत्तेत येताच आपला जाहीरनामा विसरला आहे का?

शहर तहानलेले असताना नगराध्यक्षांना फक्त कार्यक्रम, सत्कार आणि स्वागतच दिसत आहेत का?” असे थेट प्रश्न तसवर खान यांनी उपस्थित केले आहेत.

तसवर खान पुढे म्हणाले की, मुर्तिजापूर शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.

आठ दिवसांनी येणाऱ्या नळामुळे नागरिक त्रस्त असताना नगराध्यक्षांनी अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही व त्या वर आपली भूमिका स्पष्ट केली नाही.

“किमान चार दिवसांनी तरी नळ द्या, ही सामान्य नागरिकांची मागणी आहे.ही सुद्धा पूर्ण न होणे म्हणजे नगराध्यक्षांचे अपयश आहे,” असा आरोप त्यांनी केला.

पाण्यासोबतच शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, मोठमोठे खड्डे, अपघातांचा धोका, नाले सफाईअभावी रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव, कचरा उचलण्यात होणारा विलंब तसेच अनेक भागात स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

“विकासाच्या नावाखाली केवळ सोशल मीडियावर पोस्टरबाजी करून जनतेला भूल देण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्षात रस्त्यावर विकास दिसत नाही,” असा टोला नगराध्यक्ष हर्षल साबळे यांना लगावत तसवर खान यांनी स्पष्ट केले की, नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी काम करण्यास सक्षम असताना नेतृत्वाच्या अभावामुळे शहराची अवस्था बिकट होत आहे.

नगराध्यक्षांनी आपला जाहीरनामा पुन्हा एकदा वाचून त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी आक्रमक विरोधाची भूमिका घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.

“सत्ता मिळवली म्हणजे फोटोसेशन नव्हे, जनतेच्या प्रश्नांना न्याय देणे हेच खरे नेतृत्व आहे. नगराध्यक्ष अपयशी ठरले तर विरोधक शांत बसणार नाहीत,” असा ठाम इशारा वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तसवर खान यांनी दिला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!