Join WhatsApp group

Ads

-

किशनराव हुंडीवाले हत्याकांडात श्रीराम गावंडेंसह १० आरोपींना जन्मठेप

By Sarkarmzanews

January 21, 2026 6:14 pm

Ads

अकोला | दिनांक २१

महाराष्ट्रातील गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष किशनराव हुंडीवाले यांच्या सनसनाटी हत्याकांड प्रकरणी आज न्यायालयाने अंतिम निकाल जाहीर केला. अकोला येथील विशेष न्यायालयाने या बहुचर्चित प्रकरणात मुख्य आरोपी श्रीराम गावंडे याच्यासह एकूण १० आरोपींना दोषी ठरवत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

ही धक्कादायक घटना ६ मे २०१९ रोजी घडली होती. किशनराव हुंडीवाले हे एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी अकोल्यातील धर्मदाय आयुक्त (चॅरिटी कमिशनर) कार्यालयात गेले असताना दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास कार्यालय परिसरातच त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एकूण १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुरुवातीला तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे यांनी तपासाची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर बालापूर येथील सोहेल शेख, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील तसेच पोलीस निरीक्षक रायटर उमेश पाटील यांनी सखोल तपास केला.तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींविरुद्ध ठोस पुरावे संकलित करून एक हजाराहून अधिक पानांचे विस्तृत आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली.सुनावणीदरम्यान काही आरोपींविरोधात ठोस व विश्वासार्ह पुरावे नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना निर्दोष मुक्त करण्याची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती.

सर्व पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि कागदपत्रांच्या आधारे न्यायालयानेश्रीराम गावंडे, रणजित गावंडे, विक्रम गावंडे, सूरज गावंडे, धीरज गावंडे, विशाल तायडे, सतीश तायडे, प्रतीक तोंडे, मयूर अहीर आणि दिनेश राजपूत यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दरम्यान, या प्रकरणातील प्रवीण श्रीराम गावंडे, मंगेश गावंडे, दिपाली गावंडे, नम्रता गावंडे आणि शेख साबीर यांना संशयाचा फायदा देत व पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.निकाल जाहीर होताच न्यायालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!