Join WhatsApp group

पुण्यात रिक्षाचालक गणेश काळेच्या खुनाचं रहस्य उलगडलं, ‘अल्पवयीन पॅटर्न’ पुन्हा चर्चेत, सुपारी दिली कोणी?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

पुणे : ३ नोव्हे. २५ : माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आणि आंदेकर टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी कोंढव्यात रिक्षाचालक गणेश काळेचा खून करण्यात आला. आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आणि नातू स्वराज वाडेकर यांच्या सांगण्यावरून अमन शेख आणि अरबाज पटेल यांनी दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने गणेश काळेवर नऊ गोळ्या झाडून कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तिघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना सहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

यानिमित्ताने पुण्यातील टोळीयुद्धातील ‘अल्पवयीन पॅटर्न’ पुन्हा चर्चेत आला आहे. अल्पवयीन आरोपी कायद्याच्या कचाट्यात अडकत नसल्याने त्यांच्या सुटकेचा मार्ग सुकर होऊ शकतो. तसेच त्यांना भुलवून कार्यभाग साधणं सोपं असल्याने आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातील अल्पवयीन मुलांकरवी खून करुन घेण्याच्या पॅटर्नची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

अमन मेहबूब शेख (वय २०), अरबाज अहमद पटेल (वय २४), मयूर दिगंबर वाघमारे (वय २३, तिघे रा. काकडे वस्ती, कोंढवा बुद्रुक) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ६९), कृष्णा ऊर्फ कृष्णराज राणोजी आंदेकर (वय ३६), स्वराज नीलंजय वाडेकर (वय २३, तिघे रा. डोके तालीम चौक, नाना पेठ), आमीर खान (वय २५) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत गणेश काळेचे वडील किसन धोंडिबा काळे (वय ५१, रा. येवलेवाडी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणात पिस्तूल पुरविल्याप्रकरणी समीर काळे याला अटक करण्यात आली होती. सध्या तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचा भाऊ गणेश काळे रिक्षाचालक होता. तो शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास खडीमशिन चौकाजवळच्या पेट्रोल पंपाजवळ रिक्षा घेऊन थांबला होता. त्या वेळी आरोपी अमन शेख, अरबाज पटेल आणि दोन अल्पवयीनांनी गणेशवर पिस्तुलातून गोळीबार व कोयत्याने वार करून त्याचा खून केला. पोलिसांनी तातडीने तपास करून पसार झालेल्या अमन शेख, अरबाज पटेल, मयूर वाघमारे यांना अटक केली; तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

खुनाची सुपारी दिली कोणी?

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. यादव यांच्या न्यायालयात रविवारी दुपारी अटक आरोपी अमन शेख, अरबाज पटेल आणि मयूर वाघमारे यांना हजर करण्यात आले. आरोपींकडून दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. ही पिस्तुले व कोयता आरोपींनी कुठून आणला, गुन्ह्याचा कट कुठे रचला, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, आरोपी व अल्पवयीन मुले एकमेकांच्या संपर्कात कशी आली, याची माहिती घ्यायची आहे.

आरोपींचे मोबाइल व ई-मेल तपासून त्यांना खुनाची सुपारी कोणी दिली, याचा तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी निरीक्षक नवनाथ जगताप आणि सरकारी वकील प्रियंका वेंगुर्लेकर यांनी केली. आरोपींच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण यांनी बाजू मांडली. मूळ तक्रारदाराच्या वतीने ॲड. विजय लेंघरे यांनी काम पाहिले. सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने अटक आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

अमन शेख आणि अरबाज पटेल हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अरबाज पटेल याला काही वर्षांपूर्वी तडीपार करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध गेल्या वर्षी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली होती. तो अकोला कारागृहात स्थानबद्ध होता. त्यानंतर तो कारागृहातून बाहेर पडला. गेल्या वर्षी मार्च २०२४ मध्ये तळेगाव दाभाडे येथे चार ठिकाणी गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अमन शेख आणि समर्थ तोरणे यांच्याकडून तीन पिस्तुले आणि चार काडतुसे जप्त केली होती. गणेश काळे खून प्रकरणातील दोन अल्पवयीनांविरुद्धही यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!