Join WhatsApp group

कृषी नगरातील रक्तरंजित प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – कृषी नगर परिसरात १७ जुलै २०२५ रोजी घडलेल्या भयंकर हिंसाचाराच्या प्रकरणी अखेर पोलिसांनी कठोर पावले उचलली असून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई सन २०२५ मधील अकोला जिल्ह्यातील पहिली मकोका कार्यवाही ठरली आहे.

त्या दिवशी जुन्या वादातून दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाच्या संघर्षातून रक्तरंजित हाणामारी झाली. तलवारी, लोखंडी पाईप, कुऱ्हाडी, फरशी तसेच अग्निशस्त्रांचा वापर करून महिलांसह नागरिकांवर जीवघेणे हल्ले करण्यात आले. यामुळे गंभीर जखमींसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्यात टोळी प्रमुख शुभम विजय हिवाळे (वय २६, कृषी नगर, अकोला) याच्यासह एकूण १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. आरोपींमध्ये स्वप्नील प्रविण बागळे, आकाश सुनिल गवई, शंतनु गोपाल तायडे, अनिकेत उर्फ मल्हार गवई, धम्मपाल उर्फ धम्मा तायडे, निखील उर्फ बंटी चराटे, आकाश उर्फ वायु खडसे, ऋषिकेश तायडे, आदित्य उर्फ मामा कांबळे यांच्यासह इतरांचा समावेश आहे. यातील एक आरोपी विधी संघर्ष बालक आहे.

गेल्या दहा वर्षांत या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दंगा, जबरी चोरी, शस्त्रसज्ज दंगा, अश्लील शिवीगाळ, बेकायदेशीर जमाव जमविणे, तसेच बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणे असे अनेक गुन्हे नोंदवले गेलेले असून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल आहेत.

पोलिस तपासात आरोपी शुभम हिवाळे नेहमी गुन्हेगार एकत्र करून टोळी तयार करून संघटित स्वरूपात गुन्हे करत असल्याचे उघडकीस आले. यामुळे त्याच्यासह टोळीतील सर्व सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र यांच्याकडे पाठविण्यात आला. अखेर कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) मकोका १९९९ अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा व सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या पथकांनी केली.

➡️ पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी इशारा दिला आहे की,“अकोला जिल्ह्यात शांतता भंग करणाऱ्या, गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मकोका, एमपीडीए सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाईल.”

👉 ही कार्यवाही अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारी जगताला मोठा धक्का ठरली असून पुढील काळात इतर टोळ्यांसाठीही धोक्याची घंटा ठरणार आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!