Join WhatsApp group

४१ गावांमध्ये रस्ते सर्वेक्षण व अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत रस्त्यांचे सविस्तर सर्वेक्षण, सिमांकन, नोंदी अद्ययावत करणे आणि अतिक्रमण हटावाची भव्य मोहीम १० सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.

या उपक्रमाचे मार्गदर्शन मा. उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली होत असून, संपूर्ण नियोजन तहसिलदार शिल्पा बोबडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे.या मोहिमेत ग्रामसेवक, तलाठी, महसूल सेवक, पोलीस पाटील तसेच स्थानिक नागरिकांचा सहभाग राहणार आहे. १० सप्टेंबर रोजी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले असून, गावातील सर्व रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. नकाशात दर्शविलेले तसेच नकाशात नसलेले पण वहिवाटीतील रस्ते यांची माहिती प्रपत्र १ व प्रपत्र २ मध्ये संकलित केली जात आहे.

१५ सप्टेंबर रोजी ग्रामसभांमध्ये या अहवालाचे वाचन होईल. शिवार फेरीदरम्यान मिळालेल्या माहितीवर आधारित नागरिकांकडून हरकती व दावे नोंदवले जातील. त्यानंतर १६ ते १७ सप्टेंबरदरम्यान भूमी अभिलेख विभागाकडून प्रत्यक्ष मोजणी व सीमा चिन्हे स्थापित केली जातील.

१७ ते २२ सप्टेंबरदरम्यान गाव नकाशावर नसलेले रस्ते, अतिक्रमीत रस्ते यांची प्रत्यक्ष पाहणी, सुनावणी व निर्णय होणार असून आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेमार्फत अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाईल.

सर्व नोंदी प्रपत्र ३ व गाव नमुना १ फ मध्ये एकत्रित करून अद्ययावत अभिलेख तयार केला जाईल तसेच प्रत्येक रस्त्याला प्रपत्र ४ नुसार विशिष्ट क्रमांक दिला जाईल.या संदर्भात तहसिलदार शिल्पा बोबडे म्हणाल्या, “या मोहिमेमुळे रस्त्यांची ओळख कायमस्वरूपी स्पष्ट होईल, शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीस सुलभता येईल, अतिक्रमण नियंत्रणात येईल आणि भविष्यातील वाद, तक्रारी व अडचणी टाळल्या जातील.”

तालुका प्रशासनाने सर्व शेतकरी व ग्रामस्थांना या उपक्रमात सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, शासनाच्या या मोहिमेमुळे तालुक्यातील वाहतूक, शेती व ग्रामीण विकासात मोठी क्रांती होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!