Join WhatsApp group

मुर्तीजापूर नगराध्यक्षा पदाची निवडणूक : दोन तरुण उमेदवारांमुळे शहरात नवचैतन्य

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर : (प्रेमराज शर्मा)
या वेळी नगराध्यक्ष पदासाठी दोन युवा, शिक्षित आणि शांत स्वभावाचे उमेदवार मैदानात उतरल्याने मुर्तीजापूरच्या राजकारणात एक वेगळंच चैतन्य निर्माण झालं आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष तर्फे हर्षल साबळे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी तर्फे शेख इमरान या दोघांच्या उमेदवारीमुळे तरुण मतदारांमध्ये उत्साहाची लाट पाहायला मिळत आहे.

गेल्या अनेक दशकांपासून नगराध्यक्ष पदाची निवडणूक वयस्कर, अनुभवी नेत्यांच्या प्रभावाखाली व्हायची. परंतु या वेळेस तरुणाईने राजकारणात थेट नेतृत्वाची भूमिका स्वीकारली असून शहरात “युवा विरुद्ध जुना अनुभव” अशीच चर्चा रंगत आहे.

हर्षल साबळे : भाजपचा युवा चेहरा

हर्षल साबळे हे आमदार हरीश पिंपळे यांचे राजकीय विद्यार्थी म्हणून ओळखले जातात. संघटनात सक्रिय, संयमी व लोकाभिमुख स्वभावामुळे त्यांची निवड झाल्यापासूनच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तरुणपण, शिक्षण, प्रामाणिक प्रतिमा आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ही त्यांची प्रमुख ताकद मानली जाते.

शेख इमरान : वंचित आघाडीचा तरुण नेतृत्वाचा वारसा

शेख इमरान हे माजी नगरसेवक शेख खलील यांचे चिरंजीव. सामाजिक कामांची परंपरा आणि घरातील राजकीय अनुभवामुळे त्यांना प्रभागात चांगला जनाधार असल्याचे जाणवते. शांत, समतोल, शिक्षित आणि सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची त्यांची शैली वंचित पक्षासाठी या निवडणुकीत मजबूत आधार ठरत आहे.

तरुणांचा जोम, वयस्करांचा संभ्रम

या दोन्ही तरुण उमेदवारांनी निवडणुकीला नवीन दिशा दिली आहे. युवकांमध्ये “युवा नेतृत्वाने शहर बदलू शकते” असा विश्वास निर्माण होत आहे. दुसरीकडे वयस्कर मतदार मात्र अनुभवी नेतृत्व व नवीन विचार यातील निवड करताना थोडे संभ्रमात दिसत आहेत.

या निवडणुकीत युवा पिढी आपली ताकद दाखवणार, तर शहरातील पारंपरिक राजकारणाच्या समीकरणात मोठा बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शहराच्या अपेक्षा वाढलेल्या असताना, दोन्ही तरुण, शांत व संयमी उमेदवारांमधील सामना पाहण्यासाठी मुर्तीजापूर सज्ज झाले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!