Join WhatsApp group

अकोल्यात सावत्र वडिलांचा अमानुष अत्याचार : ९ वर्षांच्या बालकाची हत्या करून मृतदेह जंगलात फेकला

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला, ता. ३ जुलै २०२५
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात राक्षसी प्रवृत्तींचे बीज अंकुरते, तेव्हा तो निर्दोष जीवांचाही विचार न करता आपला क्रूर हेतू पूर्ण करतो. अशीच संतापजनक घटना अकोला शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली, जिथे एका सावत्र वडिलांनी आपल्या ९ वर्षांच्या मुलाची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून दिला.

राजस्थान चौक कॉम्प्लेक्स मध्ये राहणारा दर्शन वैभव पळसपगार (वय ९) हा काल दुपारी ३ वाजल्यापासून बेपत्ता होता. त्याच्या आईने अकोट शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.

तक्रारीची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहराचे पोलिस निरीक्षक अमोल माळवे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या नेतृत्वात तब्बल ६० पोलिस कर्मचाऱ्यांची विशेष टीम तयार करण्यात आली.

शहरातील सर्व शक्यतेचा शोध घेण्यात आला. सीसीटीव्ही तपासताना दर्शन दोन अनोळखी व्यक्तींसोबत दुचाकीवर जाताना दिसला. विशेष बाब म्हणजे त्यातील एकानेच दर्शनच्या बेपत्ततेची तक्रार करताना त्याच्या आईला पोलिस ठाण्यात नेले होते.

या आधारे तपासाची दिशा बदलत अमरावती जिल्ह्यातील अंजनगावच्या हिरापूर गावातील आकाश साहेबराव कन्हेरकर आणि गौरव वसंतराव गायगोले यांना अटक करण्यात आली. सुरुवातीला दिशाभूल करणारी उत्तरे देणाऱ्या आरोपींनी अखेर पोलिसांच्या तपासा समोर हार मानली आणि गुन्ह्याची कबुली दिली.

त्यांनी सांगितले की, दर्शनची हत्या करून त्याचा मृतदेह एका पोत्यात भरून अकोट-अमरावती सीमेवरील जंगलात फेकून दिला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेह शोधून काढला आणि तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

पोलिस आता हत्या का केली? त्यामागील कारण वैयक्तिक वाद, सूडभावना की मानसिक विकृती होती, याचा सखोल तपास करत आहेत.


🕯️ समाजात जागृतीची गरज :
दर्शनसारख्या निरागस बालकावर झालेले हे क्रूर अत्याचार केवळ एका कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी हादरवून टाकणारे आहेत. अशा राक्षसी वृत्तीला वेळेत ओळखून रोखण्यासाठी समाज, प्रशासन आणि नागरिकांची जबाबदारी अधिकच वाढली आहे.


© सरकार माझा न्यूज | अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्कात रहा


Share

Leave a Comment

error: Content is protected !!