Join WhatsApp group

२५ लाखांच्या अपहारप्रकरणी ग्रामसेविका सेवेतून बरखास्त; वसुलीचेही आदेश

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर, १९ जुलै (प्रतिनिधी):अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत दातवी येथील तत्कालीन ग्रामसेविका कु. माधुरी कल्याणसिंग दाबेकर यांना २५ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मेश्राम यांनी १४ जुलै २०२५ रोजी हा निर्णय घेतला.

ग्रामसेविका दाबेकर यांच्यावर ग्रामपंचायत निधीचा गैरवापर केल्याचा आरोप होता. यासंदर्भात त्यांच्यावर विभागीय चौकशीही करण्यात आली होती. जिल्हा परिषद अकोला येथील कृषि विकास अधिकारी तथा चौकशी अधिकारी यांनी सादर केलेल्या अंतिम चौकशी अहवालात दाबेकर यांच्यावर ठेवण्यात आलेल्या एकूण ९ आरोपांपैकी आरोप क्रमांक १, ७ व ९ पूर्णतः सिद्ध, तर २ ते ६ व ८ हे अंशतः सिद्ध झाल्याचे निष्कर्ष देण्यात आले.

त्यांना चौकशीअंती अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी दिलेला खुलासा समाधानकारक न वाटल्यामुळे तो अमान्य करण्यात आला. परिणामी, महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ अंतर्गत त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

याशिवाय, दाबेकर यांच्याकडून अपहार केलेली रक्कम – २५ लाख रुपये – वसूल करण्याचे आदेशही या निर्णयात देण्यात आले आहेत. ही वसुली ग्रामविकास विभागाने ठरवून दिलेल्या नियमानुसार करण्यात येणार आहे.या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चांगला इशारा मिळेल, असे स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!