Join WhatsApp group

मुर्तिजापूर–कारंजा रोडवरील अतिक्रमणामुळे मालवाहतूकदार त्रस्त; उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : दिनांक 18: मुर्तिजापूर–कारंजा रोडवरील स्टेशन विभागातील शिवाजी चौक परिसरात अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर झाला असून, यामुळे मालवाहतूक व्यवसाय करणाऱ्या वाहनचालक व मालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या संदर्भात सर्व सदस्य एकता माल वाहक वाहन संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी, मुर्तिजापूर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.निवेदनानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंपाऊंडच्या बाहेर तसेच नेमाडे टायपिंगच्या समोरील रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत गेल्या २५ ते ३० वर्षांपासून मालवाहक वाहने उभी करण्यात येतात.

याच ठिकाणी वाहनांना भाडे मिळेपर्यंत थांबवून चालक व मालक आपली उपजीविका चालवितात. मात्र, अलीकडच्या काळात काही अतिक्रमणधारकांनी मोठमोठे लोखंडी खोके टाकून या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे.हे अतिक्रमणधारक सदर खोके भाड्याने देऊन पैसे कमावत असून, काही जण हॉटेल व पानटपरीचा व्यवसाय करीत आहेत.

तसेच वाहनचालकांना त्या जागेत वाहने उभी करण्यास सक्त मनाई करून वाद घालण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अतिक्रमणामुळे वाहतूक अडथळे निर्माण होत असून, ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

याशिवाय, काही अतिक्रमणधारक रात्रीच्या वेळी अवैध व्यवसाय करत असल्याने परिसरातील रहिवाशांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कडेला लावलेले पेव्हर ब्लॉक काढून टाकणे तसेच मालवाहक वाहन तळासाठी लावलेला फलक हटविण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी संबंधित जागेचे तात्काळ स्थळनिरीक्षण करून अतिक्रमणधारकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी व मालवाहक वाहनांसाठी कायमस्वरूपी वाहनतळाची व्यवस्था करून न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

या निवेदनाची प्रत नगर परिषद मुर्तिजापूरचे मुख्य अधिकारी तसेच मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनाही देण्यात आली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!