Join WhatsApp group

निवडणूक संपली, वाद मात्र कायम,प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ मधील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह, जात प्रमाणपत्र व कागदपत्रांबाबत तक्रारी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर | दिनांक १४ : राजकारण हे केवळ मतदानापुरते मर्यादित नसते, याचा चित्र मुर्तीजापूर नगरपरिषद निवडणूक २०२५ नंतर प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ मध्ये दिसत आहे. २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरी या प्रभागातील ओबीसी महिला प्रवर्गातील उमेदवारीबाबत उपस्थित झालेले प्रश्न अद्याप कायम आहेत.

प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ मधून ओबीसी महिला प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या पूजा राजेश अरोरा यांच्याबाबत विविध तक्रारी निवडणूक प्रशासनाकडे दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारींमध्ये उमेदवाराच्या जात प्रमाणपत्रासह इतर शासकीय कागदपत्रांतील तफावतींबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवाराने नामनिर्देशन दाखल करताना सोनार (इतर मागासवर्गीय) जातीचे प्रमाणपत्र जोडले आहे. मात्र, त्यांच्या शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्रावर जात सिंधी नमूद असल्याचे दिसून येते. सिंधी समाज महाराष्ट्र शासनाच्या ओबीसी प्रवर्गात समाविष्ट नसल्याने या प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तसेच उमेदवार महाराष्ट्राची रहिवासी नसून मध्य प्रदेशातील उज्जैन येथील रहिवासी असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. आधार व पॅन कार्डवर उमेदवाराचे नाव महिमा चावला असल्याचे नमूद असून, निवडणूक कागदपत्रांतील नावाशी त्यामध्ये विसंगती आढळून येते. याशिवाय शाळा सोडण्याच्या दाखल्यावरील जन्मतारीख व आधार कार्डवरील जन्मतारीख यामध्येही फरक असल्याचे निदर्शनास आले आहे.

या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर विरोधी उमेदवार धनश्री बबलू भेलोंडे (भाजप) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. मात्र, मतमोजणी थांबविणे अथवा उमेदवारी अपात्र ठरविण्याबाबत अद्याप कोणतीही ठोस प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे.

दरम्यान, प्रभागातील सामन्य मतदार राम जोशी व बबलू भेलोंडे यांनी, या प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास भविष्यात उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे.

निवडणूक नियमांनुसार, आरक्षित प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराकडे वैध जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. खोटी अथवा चुकीची माहिती सादर केल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते, तसेच निवडून आल्यास पदही गमवावे लागू शकते.

या संपूर्ण प्रकरणावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असताना, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही सध्या कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ मधील या वादामुळे राजकीय वातावरण परत तापले असून, मतदारांनी केलेली मते फुकट वाया जाणार का? कि परत निवडणूक? किंवा उमेदवाराची माघार? असे प्रश्न सध्या शहरात उपस्थित झाले आहे. या नंतर प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!