Join WhatsApp group

गुन्हेगार गाड्यांमध्ये चोरी करण्यात व्यस्त, जीआरपी आणि आर पी एफ पोलिस सुस्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

३० जून २५: अकोला :अकोला रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रेल्वे प्रवासात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, गेल्या दोन दिवसांत तब्बल २ लाख ३३ हजार ५६९ रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. यामुळे आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल) आणि जीआरपी (गवर्नमेंट रेल्वे पोलिस) यांची कार्यक्षमता प्रश्नचिन्हात आली आहे.कागदावर आकडे, जमिनीवर निष्क्रियता:गेल्या वर्षी आणि चालू वर्षातील चोरीच्या घटनांबाबत पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या आकडेवारीची ढोल-ताशे वाजवत जाहिरात केली जात असली, तरी प्रत्यक्षात चोरी रोखण्यासाठी कोणतेही ठोस उपाय करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

घटनांचा आढावा:

२७ जून रोजी ट्रेन क्र. 07717 मध्ये प्रवास करणारे राजेंद्र रानुलाल जैन (60) यांच्या पासून ८ हजारांची पर्स, १५ हजारांचा मोबाईल, १० हजार रोख रक्कम, एकूण ३३ हजारांचा माल चोरीला गेला.

त्याच ट्रेनच्या दुसऱ्या कोचमधील विधी चंदू निचानी यांच्याकडून १८ हजारांचा मोबाईल आणि २५ हजार रोख, एकूण ४० हजार रुपयांची लूट झाली.

प्रयाग सिंग मंगल सिंग यांचा १२ हजाराचा मोबाईल तिकीट काउंटरवरून चोरीला गेला.२८ जून रोजी ट्रेन क्र. 11026, बर्थ नं. ८१, बोगी D5 मध्ये प्रवास करणाऱ्या दिग्विजय राजाराम पाटील यांची ८० हजार व ३९ हजार किमतीचे दोन लॅपटॉप, चार्जर, कोर्टाचे महत्त्वाचे कागदपत्रे, अशा एकूण २ लाख ३३ हजार ५६९ रुपयांचे साहित्य चोरट्यांनी पळवले.

फक्त औपचारिकता पूर्ण:या सर्व घटनांनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असला, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा अटक झाल्याचे समोर आलेले नाही.

चोरीच्या घटनांबाबत तक्रारी घेतल्या जात असल्या, तरी त्या नोंदवण्यापलीकडे पोलिसांची भूमिका मर्यादित आहे.

नागरिकांत संताप:

रेल्वे पोलीस सोशल मीडियावर अफवा पसरवू नका, चोरी गेल्या वर्षीही झाली होती अशा प्रकारचे स्पष्टीकरण देताना दिसत आहेत. मात्र, नागरिक प्रश्न विचारत आहेत की मग सुरक्षेबाबत अंमलबजावणी कुठे आहे?

आरपीएफचे कागदोपत्री उद्दिष्ट ‘प्रवाशांची सुरक्षा’ असले तरी, प्रत्यक्षात चोरी करणाऱ्यांचा सुळसुळाट आणि पोलिसांची निष्क्रियता हीच वास्तव स्थिती आहे.

रेल्वे स्थानक आणि गाड्यांमधील चोरी थांबवण्यासाठी तात्काळ कडक पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा, नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास उडण्यास वेळ लागणार नाही.

🗞️ ही बातमी तुम्हाला उपयुक्त वाटली का? शेअर करा आणि जनतेच्या सुरक्षेसाठी आवाज उठवा!


Share

Leave a Comment

error: Content is protected !!