Join WhatsApp group

सोमय्यांच्या आरोपामुळे नागरिकांना जन्म दाखल्यासाठी भटकंती – सर्वपक्षीय संघटनांची पंतप्रधानांकडे धाव

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर : दिनांक १५ : सन 2024 मध्ये नायब तहसीलदारांच्या माध्यमातून दिलेले जन्म दाखले रद्द करण्याच्या निर्णयामुळे मुर्तीजापूर व परिसरातील हजारो नागरिक संकटात सापडले आहेत. शासनाने काढलेले हे दाखले काटेकोर कागदोपत्री तपासूनच तयार झाले होते, तरीदेखील माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या दबावामुळे शासनाने दाखले रद्द केल्याचा आरोप नागरिक व सर्वपक्षीय संघटनांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर हिंदू-मुस्लिम सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांनी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले. “शासनाने नागरिकांचे प्रश्न सोडवायचे सोडून किरीट सोमय्या यांच्यासारख्या नेत्यांच्या दबावाला बळी पडून घेतलेले निर्णय म्हणजे प्रशासनाची दिशाभूल आहे,” असा आरोप या वेळी करण्यात आला.

सोमय्यांनी केलेल्या “जन्म दाखले घेणारे नागरिक हे रोहिंग्या-बांगलादेशी आहेत” या आरोपाची जिल्हाधिकाऱ्यांच्या एसआरटी कमिटीने तपासणी केली असता एकही प्रकरण खोटे निघाले नाही. तरीसुद्धा दाखले रद्द करणे हे थेट नागरिकांवर अन्याय करणारे आहे, असा सूर या वेळी उमटला.

“शासन नागरिकांना त्रास देणार की मदत करणार? किरीट सोमय्या कोण आहेत ज्यांच्या आदेशावर अधिकारी चालतात?” असा थेट सवाल या निवेदनात करण्यात आला आहे. या प्रश्नांमुळे प्रकरणाला आता राजकीय रंग चढला असून, स्थानिक पातळीवर संतापाची लाट उसळली आहे.

या निवेदनावर माजी नगरसेवक चंद्रकांत तिवारी, ज्येष्ठ शिवसैनिक विनायक गुल्हाने, समाजसेवक शेख इमरान शेख खलील, माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, निजाम इंजिनियर, माजी नगरसेवक इब्राहिम घाणीवाला, तसलीम खान, माजी नगरसेवक वैभव यादव यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, हिंदू-मुस्लिम कमिटी सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

निवेदनाची प्रत महाराष्ट्रातील मंत्र्यांसह विरोधी पक्षनेते राहुल गांधी व शरद पवार यांनाही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुढील काळात सत्ताधारी व विरोधकांमध्ये थेट राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!