Join WhatsApp group

बार्शीटाकळी : गोवंश तस्करीवर पोलिसांची धडक कारवाई – दोन बैलांची सुटका, मास जप्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

बार्शीटाकळी (जि. अकोला) दिनांक ३० जून २५ – जिल्ह्यात अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली “ऑपरेशन प्रहार” अभियान राबवले जात आहे. या उपक्रमांतर्गत गोवंश तस्करी व कत्तलीसाठी होणारी वाहतूक थांबविण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात आहेत.

२९ जून २०२५ रोजी बार्शीटाकळी पोलीस ठाण्याला गोपनीय माहिती मिळाली की, कुरेशीपुरा येथील शेख आरिफ अब्दुल अजिज यांच्या घराच्या ओसरीत दोन गोवंश जातीची जनावरे निर्दयतेने कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आली आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ५.४५ वा. पथकाने पंचासमक्ष घटनास्थळी धाड टाकली.

पोलिसांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता, दोन बैल निर्दयतेने आखूड दोऱ्याने बांधून ठेवलेले आढळून आले. त्याचबरोबर सुमारे दहा किलो गोवंश जातीचे मांस देखील जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण ७७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जनावरांना पुढील देखरेख व संगोपनासाठी आदर्श गोसेवा संस्था, म्हैसपूर येथे हलवण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेले मांस सी.ए. तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५अ, १५ तसेच प्राण्यांवर क्रूरतेने वागणूक प्रतिबंध अधिनियमाचे कलम ११ आणि भारतीय दंड विधानातील कलम ३२५ बि.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे प्रो. पीएसआय सुहास गोसावी, पो. कॉ. अमोल हाके, पो. का. प्रवीण महस्के, महिला पो. कॉ. विशाखा घायल यांनी ही कारवाई केली.

जिल्ह्यातील जनतेमध्ये या धाडसी आणि तातडीने करण्यात आलेल्या कारवाईमुळे समाधान व्यक्त होत आहे. गोवंश तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांवर पोलिसांनी केलेली ही धडक मोहीम निश्चितच स्तुत्य आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!