Join WhatsApp group

हिरपूर रोडवरील ‘रामनगर’ लेआऊट मालकांचा मनमानी कारभार? शेतकऱ्यांचा १०० वर्षांचा शेतरस्ता व नाला बंद केल्याचा आरोप

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर | दिनांक १८ : मौजे सिरसो भाग २ येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीकडे जाणारा वहितीचा शेतरस्ता व पावसाळी नाला बंद केल्याच्या आरोपावरून तहसीलदार कार्यालयात हरकत अर्ज सादर केला आहे.

हिरपूर रोडवरील ‘रामनगर’ नावाच्या नव्या लेआऊटच्या मालकाकडून बेकायदेशीर खोदकाम करून शेतरस्ता बंद करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

अर्जानुसार, मौजे सिरसो भाग २ मधील सर्व्हे नं. 224, 225, 226, 227, 230 व 231 येथील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरात असलेला शेतरस्ता सर्व्हे नं. 224 मधून सुरू होतो व त्याची नोंद गाव नकाशात आहे. हा रस्ता सुमारे १०० वर्षांपासून वापरात असून, त्याच मार्गाने मुर्तिजापूर शहरातील जुन्या वस्तीतील घाणपाणी व पावसाचे पाणी वाहून नेणारा नालाही आहे.

मात्र, रामनगर लेआऊटच्या मालकाने हा नाला अरुंद करून शेतरस्ता दोन साखळीपर्यंत बंद केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतीत पाणी साचून नुकसान होण्याची आणि शेती पडीत पडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी तहसीलदारांनी तातडीने मौका पाहणी करून बंद करण्यात आलेला नाला व शेतरस्ता मोकळा करून देण्यात यावा तसेच सुरू असलेले रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हा हरकत अर्ज गणेश पसोकर, विनोद बंग, परेश बंग, सुबोध बंग, विजय यादव, कुलदीप श्रीखंडे, मनोज यादव, शरद बंग, शम्मू भाई, राजकभाई, आनंद अग्रवाल, अनिल अग्रवाल, प्रशांत डाबेराव, राजेश्वर दीक्षित, अनिल काळे, अमोल भातुलकर व सचिन ठोकळ यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी सादर केला आहे.

या तक्रारीवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!