Join WhatsApp group

महिला व बाल संरक्षणासाठी अकोला पोलीसांचे कठोर पाऊल; अकोल्यात १२५ अपहरण गुन्ह्यांचा पर्दाफाश

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला | दिनांक १५ : अनैतिक मानवी वाहतूक विरोधी कक्ष, अकोला याची स्थापना झाल्यापासून अपहरण व मानवी तस्करीसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये प्रभावी कारवाई करत आजपर्यंत १२५ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. पीडित महिला व बालकांचा कसून शोध, तातडीचा बचाव, कायदेशीर संरक्षण व पुनर्वसन या चार सूत्रांवर कक्षाची कार्यपद्धती आधारलेली आहे.

अकोला जिल्ह्यात मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत रेड्डी तसेच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्ष महिला व बाल अत्याचारासंदर्भातील भा.दं.वि. कलम ३६३ तसेच भा.न्या.सं. कलम १३७(२) अन्वये दाखल गुन्ह्यांचा तपास करत आहे.

मानवी तस्करीविरोधी ठोस उपाययोजना

अनैतिक मानवी वाहतूक विरोधी कक्षामार्फत—

  • अपहरण, फसवणूक, जबरदस्तीचे स्थलांतर व बालविवाह यांसारख्या प्रकरणांचा समांतर तपास
  • रेल्वे स्थानके, बसस्थानके, हॉटेल, लॉज, वीटभट्ट्या, कारखाने व शेती परिसरात नियमित तपास मोहीम
  • बाल संरक्षण समिती, महिला व बालकल्याण विभाग, चाईल्ड लाईन (१०९८), स्वयंसेवी संस्था यांच्याशी समन्वय
  • पीडित मुलींसाठी समुपदेशन, वैद्यकीय तपासणी व कायदेशीर मदत
  • आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करून न्यायालयीन पाठपुरावा

या उपाययोजनांमुळे मानवी तस्करीच्या गुन्ह्यांवर प्रभावी आळा बसत आहे.

विशिष्ट प्रकरणातील कारवाई

पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन, अकोला येथे दाखल अप. क्रमांक ८९/२०२५ (कलम १३७(२) भा.न्या.सं.) या गुन्ह्याचा तपास दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी कक्षाकडे वर्ग करण्यात आला. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडिता व आरोपी कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या विशेष तपास पथकाने कुरकुंभ परिसरात छापा टाकून पीडित मुलगी व आरोपी ताब्यात घेतले. पीडितेला सुरक्षित अकोल्यात परत आणून पुढील तपासासाठी आरोपीसह पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन यांच्या ताब्यात देण्यात आले.

जनजागृती व प्रतिबंधात्मक कामगिरी

अनैतिक मानवी वाहतूक विरोधी कक्षामार्फत—

  • शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा व औद्योगिक भागात जनजागृती कार्यक्रम
  • संशयास्पद व्यक्ती व हालचालींबाबत नागरिकांकडून माहिती देण्यासाठी आवाहन
  • मानवी तस्करीविरोधी २४ तास तत्पर पथके कार्यरत

या मध्ये अकोला पोलीस पथकाची भूमिका

ही कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत रेड्डी व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सपोनि कविता फुसे, मपोहेकॉ वैशाली रणवीर, मपोहेकॉ शिल्पा मगर, सफौ राम गावंडे, वाहन चालक पोकॉ भागवत काळे व पोकॉ अजय राजपूत यांनी मोलाची भूमिका बजावली.

अनैतिक मानवी वाहतूक विरोधी कक्ष, अकोला भविष्यातही मानवी तस्करी पूर्णपणे रोखण्यासाठी कठोर व व्यापक कारवाई सुरू ठेवणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!