Join WhatsApp group

“वार्षिक निरीक्षणासह सामाजिक उपक्रमांचा संगम; मुर्तिजापुरात पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार”

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर:- दिनांक १७: जिल्हा पोलिस अधीक्षक मा. अर्चित चांडक (भा.पो.से.) यांनी पोलिस स्टेशन मुर्तिजापूर शहरचे वार्षिक निरीक्षण केले. यावेळी त्यांनी स्टेशनमधील अभिलेख, गुन्हे नोंदवही, तपासाची प्रगती, मालमत्ता नोंदी, सीसीटीएनएस कामकाज, शस्त्रसाठा तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.

निरीक्षणादरम्यान गुन्ह्यांच्या तपासात गती आणणे, प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे, महिला व बालकांबाबतच्या तक्रारी संवेदनशीलतेने हाताळणे, सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती वाढविणे तसेच बीट प्रणाली अधिक प्रभावी करण्याच्या सूचना मा. पोलिस अधीक्षकांनी दिल्या. शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नियमित पेट्रोलिंग, रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ आणि नागरिकांशी समन्वय बळकट करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.

पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीचे कौतुक करताना सेवा-सुविधा, स्वच्छता व प्रशिक्षणाबाबत आवश्यक सुधारणा करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई, बंदोबस्त नियोजन व आपत्ती व्यवस्थापन सज्जतेवरही चर्चा करण्यात आली.

याचवेळी “राज्य गणेशमहोत्सव” अंतर्गत अकोला जिल्हा पोलिस दलातर्फे व मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमातही मा. अर्चित चांडक उपस्थित होते.

या प्रसंगी ते म्हणाले की, “पोलीस दल विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांसोबतच सामाजिक जाणीव, देशभक्ती व समाजसेवेची भावना निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करत आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात करिअर घडविताना आपल्या ध्येयाकडे एकाग्र राहावे, सोशल मीडियाकडे अति लक्ष न देता शासन व शालेय स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.”

राज्य गणेशमहोत्सवाच्या निमित्ताने शहरातील भारतीय ज्ञानपीठ विद्यालय येथे निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील ९ ते १० शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ५ वी ते ८ वी आणि ९ वी ते १२ वी अशा दोन गटांत स्पर्धा घेण्यात आल्या.

सर्व गटांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे व ठाणेदार अजित जाधव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धांमध्ये भारतीय ज्ञानपीठ विद्यालय, इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन, सेंट अॅन्स स्कूल, श्री व्यंकटेश बालाजी हायस्कूल, अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल, मुर्तिजापूर हायस्कूल, परमानंद मालानी विद्यालय, मुर्तिजापूर पब्लिक स्कूल, गाडगे महाराज विद्यालय, सेंट झेवियर्स स्कूल, सरला राम काकानी आदी शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

तसेच स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन व सहकार्य केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रा. अविनाश बेलाडकर, प्रा. दीपक जोशी, प्रतिक कुऱ्हेकर व शाम वाळसकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.या संयुक्त कार्यक्रमामुळे पोलिस प्रशासनाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि समाजाशी असलेला सकारात्मक संवाद अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!