Join WhatsApp group

प्रवासी थांबा चुकवण्याच्या मनमानीत एसटी बसची दुचाकीला जबर धडक,बोरगाव मंजू येथे पत्रकार गंभीर जखमी, चालकावर कारवाईची मागणी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

कुरणखेड | दि. 16

राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस चालकांच्या मनमानीमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महामार्गावरील बोरगाव मंजू व कुरणखेडसारख्या मोठ्या गावांमध्ये अधिकृत प्रवासी थांबा असतानाही अनेक एसटी चालक बस थांबवत नसल्याने प्रवाशांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच मनमानीचा फटका आज बोरगाव मंजू येथे पत्रकारांना बसला असून एका गंभीर अपघातात दोन पत्रकार जखमी झाले आहेत.

बोरगाव मंजू हे राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे गाव असून सर्व एसटी बसगाड्यांसाठी येथे अधिकृत बस थांबा आहे. मात्र महामार्ग बायपास झाल्यापासून अनेक चालक थेट बायपासने बस नेत असून प्रवाशांशी हुज्जतबाजी करत बस स्थानकात जाणे टाळत आहेत.

आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास यवतमाळ आगाराची यवतमाळ–छत्रपती संभाजीनगर ही एसटी बस (क्रमांक MH-14 MH-0509) मूर्तिजापूरमार्गे अकोल्याकडे जात होती. नियमानुसार ही बस बोरगाव मंजू बस स्थानकात जाणे अपेक्षित असताना, चालकाने प्रवासी थांबा चुकवण्याच्या नादात थेट महामार्गावरून बायपासने बस पळवली.

याच वेळी मूर्तिजापूरकडून बोरगाव मंजू बायपासवरून गावात प्रवेश करत असलेली मोटारसायकल (क्रमांक MH-30 AW-3922) मागून येणाऱ्या एसटी बसने जोरात धडकली. या अपघातात बोरगाव मंजू येथील पत्रकार अमोल वाडेवालेआदित्य ढवढे हे गंभीर जखमी झाले असून दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जखमींना तातडीने अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे वाहतूक अधिकारी पवन राजूरकर, वाहतूक निरीक्षक राजू राठोड व अकोला आगार व्यवस्थापक सुभाष दिवटे यांनी घटनास्थळी भेट दिली.

प्रवासी थांबा असतानाही बस न थांबवणाऱ्या आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघटना व स्थानिक नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.

बातमी : योगेश विजयकर


Share

Leave a Comment

error: Content is protected !!